मध्य प्रदेशातील कटनी येथून रोजगारासाठी ५२ मजूर आपल्या कुटुंबीयांसमवेत ऊसतोडणीच्या कामासाठी सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मुकादम सुनील मोटे यांनी अनामत रकमा घेऊन ऊसतोडीचे काम सुरू केले. मात्र त्यांना कामाचा अनुभव नसल्याने ऊसतोड करणे जमत नव्हते. त्यामुळे मजुरीची रक्कमही मिळणे बंद झाले होते. उपासमार होणाऱ्या मजुरांकडून गावी पाठवण्यासाठी विनंती करण्यात येत होती. मुकादमानेही या सर्व मजुरांना डांबून ठेवले होते.
वैतागलेल्या मजुरांनी आपली समस्या मध्य प्रदेशातील कटनीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. त्याची दखल घेत सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते यांनी कंदलगाव येथे अडकलेल्या सर्व मजुरांना विशेष बसद्वारे त्यांच्या गावी परत पाठविण्याची व्यवस्था केली.
----
विशेष बसमधून सर्व मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेवर पाठविण्यात आले. त्यासाठी मुकादम व ऊसतोड मजुरांमध्ये समन्वय घडवून आणला. प्रत्येक मजुराला दोन हजार रुपये मजुरीची रक्कम उपलब्ध केली. शिवाय प्रवासात जेवण, सोलापुरी चादर, टॉवेल तसेच सॅनिटायझर व मुखपट्ट्या पुरविण्यात आल्या. मध्य प्रदेशच्या सीमेवर तेथील प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी पार पाडली.
-----
----मध्य प्रदेशातून रोजगारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात आलेल्या मजुरांना ऊसतोडीचा अनुभव नव्हता. त्यांची गावी परत जाण्याची मागणी होती. मात्र मुकादमाने त्यांना डांबून ठेवले होते. पोलिसांनी विचारपूस करूनही मजुरांनी तक्रार केली नाही. तक्रारीअभावी पोलिसांना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता आली नाही.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण