सोलापूर : गुरुवारी लोकसभेसाठी सोलापूर मतदारसंघात मतदान झाले़ या मतदानप्रक्रियेत सर्वच केंद्रांवर विशिष्ट पोशाखातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अपंग, वयोवृद्ध आणि आजारी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत केली़ लोकशाही बळकट व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून या विद्यार्थी स्वयंसेवकांनी केलेली सेवा लोकशाहीची सेवाच ठरली.
सोलापूर मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागात लोकसभेसाठी मतदान झाले़ मतदारसंघात जवळपास १९०० केंद्रे असून, या सर्वच केंद्रांवर आजारी, अपंग आणि वयोवृद्ध नागरिक मतदानासाठी येतात़ त्यांना केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही़ या प्रक्रियेत जवळपास १२ हजार कर्मचारी नियुक्त असले तरी प्रत्येक मतदाराला एक प्रकारची मदत हवी असते आणि ती शंभर टक्के मिळावी या हेतूने प्रशासनाला आणि सर्वसामान्य मतदारांचा दुवा ठरावा, मदत व्हावी या उद्देशाने प्रत्येक शाळेतील आरएसपी आणि स्काउट गाईड पथकांची मदत देण्यात आली़ ही मदत सहजतेने मिळावी म्हणून प्रत्येक केंद्रावर जवळपास दहा स्वयंसेवकांचे पथक होते.
लोकशाहीत सर्वसामान्यांना मताची किंमत कळावी, शंभर टक्के मतदान होण्यासाठी हातभार लागावा आणि असहाय्य लोकांना केंद्रापर्यंत पोहोचता यावे या उद्देशाने शाळेने स्काउट गाईड आणि आरएसपीचे पथक नेमले़ आदरयुक्त वागणुकीबरोबरच मदतीचा हात या मुलांनी पुढे केला आहे़ ही सेवा लोकशाहीची सेवा ठरली आहे.- शैलेश स्वामीस्काऊट गाईड प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल