अकलूज : रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानून गेली ३५ वर्षे रुग्णांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसेविका सुभद्रा ज्ञानेश्वर काकुळे यांनी सध्याच्या कोरोना काळात मुलगी कोरोनाबाधित झाली असताना, तिला विलगीकरण करून ताणतणावाच्या परिस्थितीतही आपली परिचारिकेची सेवा बजावत आहेत.
अकलूज उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठ परिसेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या सुभद्रा काकुळे यांनी १९८५ साली प्राथमिक आरोग्य केंद्र मोहोळ येथे परिचारिका म्हणून आरोग्यसेवेस प्रारंभ केला. त्यानंतर १९९६ साली त्यांची अकलूज ग्रामीण रुग्णालय येथे बदली झाली.
अकलूज ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेबरोबरच लसीकरण मोहीम, इतर रुग्णांना आरोग्य सेवा, शस्त्रक्रियेत सहायक म्हणून उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल, काकुळे यांना २००६ साली दुसऱ्यांदा उत्कृष्ट सेवेसाठी विशेष वेतनवाढ देण्यात आली आहे.
अकलूज उपजिल्हा रुग्णालयात २००७ ते २०१९ काळात त्यांनी सलग १२ वर्षे २४ तास शस्त्रक्रियागृहात परिसेविकेचे कर्तव्य केले आहे. त्यांनी १९९६ ते २००७ कालावधीत जवळपास ८०० गरोदर मातांची प्रसूती सेवा केली. ३५ वर्षे ५ महिने १९ दिवस परिचारिकेची सेवा करून त्या येत्या ३१ मे रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत. गत वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटात त्यांना स्वेच्छानिवृत्त होता येत होते, परंतु परिचारिका व्रत हाती घेताना रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानून घेतलेली शपथ सुभद्रा काकुळे यांनी सार्थ ठरवित, रुग्णसेवेचा घेतलेला वसा पार पाडत आहेत.
----
पतीसह मुला-मुलीची साथ
सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुभद्रा काकुळे यांची मुलगी पूजा ही कोरोनाबाधित झाल्याने, तिला विलगीकरण करून डाॅक्टरांकडून औषधोपचाराने कोरोनामुक्त केले. मुलगी कोरोनाबाधित झाल्यावर मनावर ताणतणाव असूनही काकुळे यांनी गृहिणीचे दक्षतेने कर्तव्य पार पाडत परिसेविकेचे कर्तव्यही तितकेच काळजीपूर्वक करीत रुग्णसेवा केली आहे. त्यांच्या परिचारिका कर्तव्यात पती, मुलगा व मुलींची साथ लाभल्याने परिचारिका म्हणून रुग्णसेवेचे कर्तव्य यशस्वीपणे पार पडले. येत्या ३१ मे रोजी सुभद्रा काकुळे या सलग ३५ वर्षे रुग्णसेवा करून समाधानाने सेवानिवृत्त होत आहेत.
---
११सुभद्रा काकुळे