अक्कलकोट : अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या चार लसीकरण केंद्रावर नागरिकांना नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी मोफत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. शहरात ग्रामीण रुग्णालय, जुना तहसील कार्यालय, सेंट्रल चौक, बुधवार पेठ येथील कन्नड शाळा अशा चार केंद्रावर मागील काही दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याची प्रचिती नगरसेवक कल्याणशेट्टी यांना एक दिवस लस घेण्यासाठी गेले असता आली. उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून नागरिक रांगेत थांबण्याच्या ठिकाणी मंडप उभारून दिला. ज्येष्ठांना काही काळ बसता यावे म्हणून खुर्च्या उपलब्ध करून दिल्या तसेच जारचे थंड पाणी उपलब्ध करुन दिले. तसेच चहाचीही व्यवस्था केली. अशाप्रकारच्या सोयीसुविधा चारही केंद्रावर स्वखर्चातून उपलब्ध करून दिली. यामुळे ज्येष्ठांसह नागरिकांची सोय झाली आहे.
----
एक दिवस लस घेण्यासाठी एका केंद्रावर गेलो असता ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दिसून आली. त्यांच्यासाठी विविध सोयीसुविधा स्वखर्चातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. लसीकरण जितके दिवस सुरू राहणार आहे, तोपर्यंत सेवासुविधा सुरू राहतील.
- मिलन कल्याणशेट्टी
नगरसेवक