Solapur District Bank ( Marathi News ) : जिल्हा मध्यवर्ती बँकेने बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी जबाबदार धरण्यात आलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह दोन अधिकारी व एका सीएसह ३५ लोकांची मालमत्ता ताब्यात घेऊन २३८ कोटी ४३ लाख ९९९ हजार रुपये १२ टक्के व्याजासह रक्कम वसूल करावी, असे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहेत. आता संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा मध्यवर्ती बँकेने करायची आहे.
जिल्हा मध्यवर्ती बैंक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी ८३ व ८८ कलमान्वये चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य कर्ज वाटप करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. बँक संचालकांनी स्वतःचे साखर कारखाने, शिक्षण संस्थांना बेकायदेशीर कर्ज घेतले; मात्र ते भरले नसल्याने बँक आर्थिक अडचणीत आली. ८८ अन्वये चौकशीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह ३५ लोकांवर २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपये व कर्ज उचलल्यापासून १२ टक्के व्याजासह रक्कम वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत. या आदेशानुसार विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी ९८ अन्वये संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले आहेत. आता जबाबदारी निश्चित केल्याप्रमाणे रक्कम वसुलीसाठी बँकेने कार्यवाही करायची आहे.
दरम्यान, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चौकशी व कारवाई सुरू आहे.
कोणकोणत्या नेत्यांकडे किती रक्कम बाकी?
- दिलीपराव सोपल- ३० कोटी २७ लाख २८ हजार १२२
- विजयसिंह मोहिते-पाटील- ३ कोटी ०३ लाख ५४ हजार २४२
- दीपकराव साळुंखे-पाटील- २० कोटी ७२ लाख ५१ हजार २७०
- सुधाकरपंत परिचारक- ११ कोटी ८३ लाख ०६ हजार २७७
- प्रतापसिंह मोहिते-पाटील- ३ कोटी १४ लाख ६५ हजार ४९७
- राजन पाटील- ३ कोटी ३४ लाख २१ हजार ३५७
- रणजितसिंह मोहिते-पाटील- ५५ लाख ५४ हजार ६६०
- दिलीप माने- ११ कोटी ६३ लाख ३४ हजार ५६८
- संजय शिंदे - ९ कोटी ८४ लाख ४४ हजार ७९९
- बबनराव शिंदे- ३ कोटी ४९ लाख २३ हजार ०४१
- रश्मी दिगंबरराव बागल - ४३ लाख २६ हजार १०९
एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपये व्याजासह वसूल करण्याबाबतचे पत्र विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला शुक्रवारी दिले आहे.