Devendra Fadnavis ( Marathi News ) :सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवान राजकीय हालचाली सुरू आहेत. माढ्यात शरद पवारांनी मोहिते पाटील कुटुंबाला आपल्याकडे खेचत भाजपला धक्का दिल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा तरुण नेता गळाला लावण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने सील केल्यामुळे अडचणीत आलेले अभिजीत पाटील हे भाजपचा वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे आज सोलापूर मुक्कामी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची अभिजीत पाटलांसोबत बैठकही होणार असल्याचे समजते.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सांगोला, अकलूज आणि वाकाव इथं आज देवेंद्र फडणवीसांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभा संपल्यानंतर फडणवीस हे सोलापुरात मुक्काम करणार आहेत. यावेळी अभिजीत पाटील त्यांची भेट घेतील, अशी माहिती आहे. साखर कारखान्याच्या अडचणींमुळे पाटील हे सत्तेसोबत जाण्याचाही निर्णय घेऊ शकतात. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काही महिन्यांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच पाटील यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातही चांगला जनसंपर्क आहे. असा तरुण नेता भाजपमध्ये गेल्यास हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे.
अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर काय कारवाई झाली?
अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर-गुरसाळे या कारखान्याच्या ३ गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिल केलं आहे. करमाळा इथं सभा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही माहिती अभिजीत पाटील यांना देताच ते ताडकन् उठले आणि पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते.
माढ्यात फडणवीसांची आणखी एक खेळी
माढा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मतदारसंघात राेज नवे राजकीय डाव टाकले जात आहे. फडणवीस यांची रविवारी अकलूजच्या विजय चाैकात जाहीर सभा हाेणार आहे. ही सभा झाल्यानंतर फडणवीस पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांचे विराेधक तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी चहापान घेण्यासाठी जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी माढ्यात नवी जुळवाजुळव सुरू केली असून माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांसोबत नुकतीच त्यांनी बैठक घेतली. या नेत्यांनी भाजपसाेबत जाण्याचा निर्णय घेतला. आता फडणवीस थेट आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील आणि धैर्यशील माेहिते-पाटील यांचे विरोधक धवलसिंह यांच्या घरी जाणार आहेत.