सोलापूर : कोरोना संसर्गामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रकल्प बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून सर्वत्र औद्योगिक घटक चालू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील १००१ कारखानदारांनी परवानगी घेतली असून, आतापर्यंत ३६९ सूक्ष्म, लघु प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पात ७ हजार ५०० कामगार काम करीत असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख बी. टी.यशवंते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते. लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असल्याने अर्थव्यवस्था बिघडत चालली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे सुरू होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्वच उद्योग काही अटी, नियमांच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी दिली होती.
सुरुवातीच्या काळात उद्योगधंदे सुरू करण्यास कारखानदारांकडून नकार देण्यात येत होता; मात्र आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाल्याचे सांगण्यात आले. आता देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे, यात आणखीन जास्तीत जास्त औद्योगिक घटक सुरू होण्याची आशा जिल्हा उद्योग केंद्राने व्यक्त केली. कामगारांच्या हाताला काम मिळाल्याने कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे़
या कारखान्यांचा आहे समावेश...- सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पात जीवनावश्यक वस्तू, शेतीवर आधारित औद्योगिक प्रकल्प, सॅनिटायझर, मास्क, रासायानिक खते, बी-बियाणे, औषध निर्मिती व त्यास लागणारे रसायन निर्मिती, इंजिनिअरिंग वस्तू निर्मितीचा समावेश आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर काही उद्योजकांनी रितसर परवानगी घेऊन नियम, अटींचे पालन करून औद्योगिक घटक सुरू केले आहेत. आता पाचव्या टप्प्यात जिल्ह्यात नक्कीच सर्वच कारखाने, प्रकल्प सुरू होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल यात शंका नाही. उद्योजकांनी कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करून प्रकल्प सुरू करावेत.- बी. टी. यशवंते,जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर.