सोलापूर : जिल्ह्यात दररोज सरासरी सात जनावरांचा लम्पीने मृत्यू होत आहे. तर दररोज 50 ते 60 जनावरे लम्पी बाधित होत आहेत. मागील दोन महिन्यांपासून जनावरांच्या आजारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
दोन ते तीन महिन्यांपुर्वी लम्पी आजार नियंत्रणात आला होता. आता मात्र पुन्हा आजाराला जनावरे बळी पडत आहेत. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यात सध्या सर्वात जास्त जनावरे बाधित होत आहे. औषधांचा साठा पुरेसा असून लसीकरणही झाले आहेत. तरीही लम्पी आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढतच आहे.
या पार्श्वभूमीवर सीईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, सर्व ग्रामपंचायती व पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेतली. या बैठकीत लम्पी आजार प्रतिबंधात्मक कामाच्या बाबतीत हलगर्जी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवा अशा सुचना पशुसंवर्धन विभागाचे विभाग प्रमुख नवनाथ नरळे यांना देण्यात आल्या. लम्पी आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
मृतांची संख्या वाढताना अनुदान बंद
जिल्ह्यात सध्या लम्पीने मृत होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत शासनाने 31 मार्चनंतर अनुदान देणे बंद केले आहे. यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 1 एप्रिलनंतर मृत झालेल्यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराश झाले आहेत.