आॅनलाइन लोकमत सोलापूरविजयपूर दि ११ : इंडी परिसरातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात अनेक पिस्तूल आणि जिवन्त काडतूस पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली़ सोमवारी पुन्हा दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केल्याची घडना इंडी तालुक्यातील नंद्राळ क्रॉसजवळ घडली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना टाटा इंडिका मोटारसह अटक केली आहे. इजाज बंदेनवाज पटेल उर्फ बिरादार (रा. नंद्राळ), रजनीकांत उर्फ लाल्या मरेप्पा गिरिणीवड्डर, महेश श्रीशेल क्षत्री (दोघेही रा. बरगुडी), सिद्दप्पा नागप्पा हत्तूर (रा. भतगुणकी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. इंडी तालुक्यातील हलसंगीकडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या नंद्राळ क्रॉसजवळ काहीजण बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्र घेऊन जाणार असल्याची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शिवकुमार गुणारे तसेच विजयपूर व इंडी विभागाचे डीवायएसपी रविंद्र शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून सापळा रचण्यात आला. रविवारी ठरल्याप्रमाणे चडचण पोलीस स्थानकाचे सीपीआय एम. बी. आसोडे, झळकी पोलीस स्थानकाचे पीएसआय सुरेश बेंडेगुंबळ व इतर पोलीस अधिकाºयांनी हलसंगी क्रॉसजवळ सापळा रचला. याचवेळी केए २८ ए ४४७६ या क्रमांकाची एक कार येत असल्याचे पोलिसांना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी ही कार अडवून चौकशी केली. यावेळी इजाज, रजनीकांत, महेश व सिद्दप्पा यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवून कारची तपासणी करण्यात आली. कारमध्ये दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे आढळून आली.पोलिसांनी वरील चारही संशयितांना अधिक चौकशीसाठी अटक केली. तसेच त्यांनी वापरलेली कार, पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. आलमेल येथील काहीजणांना चन्दप्पा हरिजन तसेच भागप्पा च्या हस्तकांना गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असून या टोळीला सातत्याने मदत केल्याच्या आरोपावरून काही जणांना लवकरच अटक करणार असल्याचे सांगण्यात आले याप्रकरणी सर्वांवर झळकी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इंडी येथील न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी विजयपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
इंडी तालुक्यात दोन गावठी पिस्तुलांसह सात काडतुसे जप्त, चार संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 6:55 PM