काशिनाथ वाघमारे, सोलापूर : करमाळ्यात एटीएम फोडणारी हरियाणातील टोळीमधील तिघांना विटा पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून १४ लाख ६४ हजारांपैकी सहा लाख २० हजार ६०० रुपये आणि एक टेम्पो जप्त केला. ही टोळी घेऊन विटा पोलिस करमाळ्यात दाखल झाले. येथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सैफुल दुल्ली खान (वय ३७), निसियुम नियाज अहमद (वय २४) व हसन रहेमत (वय ५३, सर्व रा. हरियाणा राज्य) अशी या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून सहा लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर करमाळा (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात एटीएम फोडण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, पहाटे एटीएम फोडून पलायन केलेली टोळी विटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत विटा- तासगाव रस्त्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीवरून येथील एका पेट्रोलपंपासमोर रस्त्याला तासगावहून एक टेम्पो (एचआर ७४ ए ५०३०) येत होती. या टेम्पोला पोलिसांनी अडवून झडती घेतली. यावेळी एका प्लास्टिकच्या कागदामध्ये दोन वेल्डींग करण्यासाठी वापरण्यात येणारे सिलिंडर, गॅस कटर, रबर पाइप, रेग्युलेटर, दोन चाकू, कागदपत्राच्या फाइली, तीन मोबाइल मिळाले. चौकशीत सर्व साहित्य त्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरल्याचे समोर आले. आरोपींनी करमाळा येथील एटीएम फोडून पळून आल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून टेम्पोसह सर्व सामानासह सहा लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी सर्व आरोपींना करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांनी आरोपींना करमाळा न्यायालयात हजर केले.