मोहोळ : सीना नदीच्या पात्रातून एकुरके गावच्या परिसरात स्मशानभूमीजवळ ठेवलेल्या बेकायदेशीर वाळूसाठ्यावर मोहोळ पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकून सहा ट्रॅक्टर व एक जेसीबी असा ९८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.
सीना नदीच्या परिसरातील एकुरके गावच्या परिसरात वाळूचा साठा केल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कदम, अमोल घोळवे, सचिन पुजारी, श्रीशैल्य शिवणे, सत्यवान जाधव यांच्या पथकाने धाड टाकली. पोलीस पथकाला पाहाताच जेसीबीच्या साह्याने वाळू भरणाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी जेसीबी (एम.एच १३ डी ई ७२५९) क्रमांकाचा जेसीबी आणि वाळूने भरलेले सहा ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
या कारवाईत १ लाख २० हजार रुपयांची वाळू जप्त केली.
या कारवाईत अमोल भास्कर ढवण, नानासाहेब चांगदेव साठे, सोमनाथ नागनाथ कोल्हाळ, नीलेश उत्तम कोल्हाळ (सर्व रा. एकुरके), विलास भीमराव ढेरे, उमेश भारत ढेरे (रा. बोपले) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वाळू एकुरके गावचे पोलीस पाटील तानाजी भानुदास साठे यांच्या बांधकामावरती घेऊन जात असल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पोपळे हे करीत आहेत.
---
फोटो : २३ मोहोळ
मोहोळ पोलिसांच्या पाथकाने एकुरके येथे वाळूसाठ्यासह वाहने जप्त केली.