चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घरात सतत तुळजाईचा दिवा तेवतो. आताच नव्हे तर गेल्या सतरा वर्षांपासून या गावातील प्रत्येक घरात नवरात्रीच्या काळात तुळजापूरहून आलेल्या दीपज्योतीतून तुळजाईचा दिवा समर्थपणे तेवतो आहे. याचे सगळे श्रेय जाते ते येथील श्री बसवेश्वर गणेशोत्सव मित्रमंडळ, भंडारकवठे गल्ली आणि महालक्ष्मी तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांना!
चपळगावातील महालक्ष्मी गल्लीतील मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी देवीची स्थापना केली जाते. त्यापूर्वी आदल्या दिवशी रात्री दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते तुळजापूर येथून दीपज्योत आणण्यासाठी जातात. ते नेमके घटस्थापनेच्या दिवशी सकाळी चपळगावी पोहोचतात. मेणबत्ती किंवा दिव्याच्या माध्यमातून प्रत्येक घराघरांतील देव्हाºयावरील पणतीत हा दिवा लावतात. गावातील प्रत्येक घरासमोर देवीची ज्योत घेऊन जाण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात. तुळजापूरच्या भवानी मातेचा आशीर्वाद समजून प्रत्येक घरातील महिला व इतर सदस्य आभार मानतात.
मंडळाच्या कार्यासाठी संस्थापक सिध्दाराम भंडारकवठे, विशालराज नन्ना, विजयकुमार कोरे,धर्मेंद्र दुलंगे, अंबण्णा भरमशेट्टी, शशिकांत लादे सतत कार्यशील असतात.
यावर्षी नवरात्र महोत्सव निमित्ताने चपळगावातील बसवेश्वर गणेशोत्सव मित्रमंडळ आणि महालक्ष्मी तरूण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी शिवशरणी अक्कमहादेवी प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. दरवर्षी विविध कार्यक्रम होतात.
चपळगाव येथील महालक्ष्मी नवरात्र महोत्सव तरूण मंडळ आणि श्री बसवेश्वर गणेशोत्सव मित्रमंडळ, भंडारकवठे गल्ली यांच्या वतीने वर्षभर समाजोपयोगी उपक्रम घेतले जातात. या माध्यमातून समाजोन्नती साधली जाते.- उमेश पाटील माजी सरपंच, चपळगाव