सांगोला : माण खोऱ्यातील ज्या माडग्याळ नर मेंढ्याला ७१ लाखांची बोली आली होती, त्या सर्जा मेंढ्याला न्यूमोनियाची लागण झाल्याने उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सर्जाच्या अचानक जाण्यामुळे मेटकरी कुटुंबीयासमवेत सांगोला-चांडोलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चांडोलेवाडी येथील मेंढपाळ बाबूराव मेटकरी यांनी माडग्याळ जातीचा नर मेंढा पाळला होता. रंगाने लाल व चॉकलेटी, ४ दाती मेंढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावर पोपटाच्या चोचीसारखा आकार असल्याने याला मागणी जास्त होती. यामुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे नाव ‘सर्जा’ ठेवले होते. बाबूराव मेटकरी वर्षाकाठी मेंढ्याच्या व्यवसायातून सुमारे ५० लाखांचे उत्पन्न मिळवत होते. त्यांच्याकडे असणाऱ्या या सर्जा मेंढ्याला आटपाडीच्या बाजारात सुमारे ७१ लाख रुपयांना मागणी आल्याने ‘सर्जा’ने चांगलाच भाव खाल्ला होता.
कितीही किंमत आली तरी मेंढा विक्री करण्याचा बाबूराव मेटकरींचा विचार नव्हता. त्याच्यापासून जातीवंत पिलं, मादी व नर पैदास करण्यासाठी तो ठेवला होता. गेल्या आठवड्यात त्यास न्यूमोनियाची लागण झाल्याने त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वाडग्यावरच उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान कासेगाव (ता. पंढरपूर) येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्याचा मृत्यू झाला.
----
मृत्यूच्या वृत्तानं कुटुंबावर शोक अनावर
त्याच्या मृत्यूची बातमी कळताच मेटकरी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. ‘सर्जा’चा अगदी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. तो कुटुंबातील एक सदस्यच बनला होता. सर्जा केवळ सांगोल्यात नव्हेतर, माण खोऱ्यासह कर्नाटकापर्यंत प्रसिद्ध होता. त्याच्यावर चांडोलेवाडी येथे मेटकरी कुटुंबीयांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.
-----
माझा सर्जा गुणाने चांगला व देवमाणूस होता. म्हणूनच तो महाराष्ट्राची शान होता. कोणत्याही बाजारात किंवा जत्रेत गेला तर सर्जाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे. पैसा अमूल्य आहे परंतु सर्जा गेल्याचं दुःखही तितकंच आहे. सर्जाचे वडील ‘राजा’ वारले आणि जाताना सर्जाला उभे करून गेले. आता सर्जा गेला पण तोही मागे दोन पिलं तयार करून गेला. या पिल्लांमधूनच एक वर्षात सर्जाप्रमाणे नर तयार करणार आहोत.
- बाबूराव मेटकरी, मेंढपाळ
-----
सांगोला-चांडोलेवाडी येथे माडग्याळ जातीचा नर मेंढा ‘सर्जा’वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजूस मेंढपाळ बाबूराव मेटकरी समवेत सर्जा नर मेंढा.
----