मागच्या वर्षी कोरोनाने थैमान घातले होते त्यामुळे अनेक मजुरांनी आपली कामे जागेवरच सोडून घर जवळ केले. त्यामध्ये गतवर्षी मोडनिंब जवळील अरण ते मोडनिंब या पांडुरंग पालखी मार्गावरील मजुरांनाही अर्धवट काम सोडून गावी जावे लागले. ते मजूर विदर्भातील रिसोडचे (ता. मांडवा, जि. वाशिम) पस्तीस महिला व पुरुष आपल्या चिमुकल्यांसह मोडनिंबजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर काम करण्यासाठी यंदाही आलेले आहेत.
सोमवारी १५ फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने सकाळपासूनच आपल्या दैवताची पूजा करण्यासाठी लगबग सुरु होती. आज दररोजच्या कामाला विश्रांती दिली. सर्व मंडळी कामाला लागली. संत सेवालाल महाराजांचा फोटो मिळवला. त्यांची तंबूजवळच प्रतिमा ठेवून सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि त्या ठिकाणी फेर धरून संत सेवालाल महाराजांचा जयघोष केला. आपल्या मनामध्ये असणारा आदर व प्रेम व्यक्त केले. यामध्ये महिलांसह त्यांच्यासमवेत चिमुकल्यांनी सहभागी होऊन आनंद लुटला.
यावेळी या मजुरांसमवेत असणारे मुकादम संजय जाधव यांनी सांगितले की, सर्व मजुरांनी पहाटे लवकर उठून खडी फोडण्याचे आपापले काम पूर्ण केले. सकाळी दहा वाजता सर्वजण एकत्र जमले आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांचा जयघोष केला.
मोडनिंब ते अरण या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. एका रिकाम्या शेतात सतरा ते अठरा पालाच्या झोपड्या उभा करून मुलाबाळांसह हे सर्व मजूर त्यामध्ये राहत आहेत. मात्र संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करुन त्यांनी आमच्या संतांचा आम्हाला विसर पडत नाही हे दाखवून दिले.
----
दैवताचा नाही विसर
आम्ही महाराष्ट्र कुठेही कामाला गेलो तरी संत सेवालाल महाराजांचा विसर आम्हाला कधीच पडत नाही. जयंती व पुण्यतिथीची तारीख आम्ही बघून त्या साजरा करतो. सेवालाल महाराज म्हणजे आमचा दैवत असल्याचं मजूर शीला राठोड, प्रियंका जाधव ,संगीता चव्हाण, व गोपीनाथ राठोड यांनी सांगितले.