मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. यातच, आता सोलापूरमध्ये शाहरुख खानच्या डुप्लीकेटची एन्ट्री झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस पक्ष उघडपणे लोकांची फसवणूक करत आहे, असे भाजप प्रवक्ता शाहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे. एवढेच नाही तर, पूनावाला यांनी यासंदर्भातील काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी निवडणूक आयोगालाही टॅग केले आहे. याशिवाय, मुंबई भाजपचे प्रवक्ता सुरेश नाखूना यांनीही एक व्हिडिओ साेशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या सोबत, काँग्रेस फेक सर्व्हेनंतर, आता फेक कँपेनही करत आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.
काँग्रेसवर निशाणा -या संदर्भात पूनावाला यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, "काँग्रेसचा आणखी एक घोटाळा. पक्षाने निवडणूक प्रचारासाठी डुप्लिकेट शाहरुख खानला भाड्याने घेतले आहे. हा पक्ष लोकांना किती मूर्ख बनवत आहे, याची कल्पना करा. खोट्या सर्व्हेंना प्रोत्साहन देणे, भारतविरोधी नॅरेटिव्ह सेट करणे, AI आणि deepfakes नंतर, आता डुप्लिकेट सेलिब्रिटीज. आपण समजू शकता की, हा पक्ष का आधीपासूनच ईव्हीएमला दोष देत आहे.
ही पोस्ट पूनावाला यांनी शाहरुख खानलाही टॅग केली आहे.