विलास जळकोटकर
सोलापूर: येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि विविध समाजाचे सण उत्सवाच्या काळात सोलापुरात मुली व महिलांना त्रासदायक ठरणारी सराईत गुन्हेगार शमा इब्राहिम शेख (वय- ४३) या महिलेला दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश शहर पोलिसांनी मंगळवारी बजावला. या जोडीलाच सतीश क्षीरसागर (वय- ३२) या गुंडावरही अशीच कारवाई करण्यात आली. शहर आणि परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयु्क्तांनी एकापाठोपाठ तडीपार, एमपीडीए कारवाईचा सपाटा लावला आहे. विजापूर नाका व सोलापर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना, मुली व महिलांना शमा इब्राहिम शेख (वय- ४३, रा. राजीव नगर, शांतीनगर, सोलापूर) या सराईत गुन्हेगार असलेल्या महिलेचा उपद्रव वाढला होता. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या महिलेविरुद्ध गंभीर स्वरुपाचे २ गुन्हे दाखल आहेत.
सोमवारी तिला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस उपायुक्तांनी सोलापूर शहर -जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीचे आदेश बजावून कर्नाटकातील हगलूर येथे सोडण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, संगीता पाटील, सपोनि शीतलकुमार गायकवाड, रमेश कोर्सेगाव यांनी केली.
अजयला पिंपरी चिंचवडला सोडले
तडीपार करण्यात आलेला दुसरा आरोपी सतीश सुधीर क्षीरसागर (वय- ३२, रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, ठार मारण्याची धमकी, गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याने तडीपारचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्याला आदेश बजावून निगडी पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आले.