आप्पासाहेब पाटील
सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते मनोहर मंगल कार्यालयाच्या रस्त्यावरील नागरिकांच्या अडचणींबाबत वारंवार तक्रार करून, फोनवरून सांगून, निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने गुरूवारी अनोखे आंदोलन केले. घाण पाण्यात फुले टाकून बेशर्मीची झाडे लावून महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा चे मनोहर मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर साचलेले सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्ता अर्धवट केल्यामुळे अभिमान श्री फेज वन, फेज टू व इतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अपुऱ्या रस्त्याचे काम थांबवल्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने अनेकदा फोनवर तसेच निवेदनाद्वारे समस्या मनपाकडे मांडण्यात आली होती, परंतु परिस्थिती जैसे थे होती. गुरूवारी आंदोलन करून लक्ष वेधले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, संघटक महेश धाराशिवकर, बंटी बेळमकर, सुरेश जगताप, ऋषिकेश धाराशिवकर, लहू गायकवाड, अण्णा गवळी, उत्कर्ष जमदाडे, प्रकाश ननवरे, रवी शर्मा, नाना कळसकर, आसिफ मुल्ला, जरगीस मुल्ला, माणिक चौधरी, कालू रॉय, ज्ञानेश्वर घुले, महिला आघाडीच्या सो मीनाक्षी गवळी, वैशाली सातपुते आदी उपस्थित होते.
आंदोलन चालू असताना मनपाचे अधिकारी आले
नागरिकांच्या समस्येसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन करीत असल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांना काम करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळाने जेसीबी, डंपर आणून परिसर स्वच्छ केला, मात्र पुलाचे काम लवकर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.