प्राचीन काळापासून मडकी बनवणारा कुंभार व्यवसाय आजच्या बदलत्या काळातदेखील आपले अस्तित्व टिकवून आहे. संक्रांत पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने करमाळा तालुक्यातील गावोगावी संक्रांतीचे मडकी बनवण्यात कारागीर व्यस्त आहेत. तालुक्यातील राजुरीच्या वैजीनाथ वाघमारे हे जुन्या पद्धतीने चाकाचा वापर करून मडकी बनवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मातीची कारागिरी बदलली असली तरी मी शिकलेली जुनीच कारागिरी वापरात असून, एकदा हात बसला की मातीच्या गोळ्याला आकार देणे सोपे जाते असे वैजीनाथ वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मडकी बनवण्यासाठी वाघमारे हे गाळाची माती दिवसभर भिजवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून फिरत्या चाकावर चिखल मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन मडकी तयार करतात. कच्च्या अवस्थेत तयार झालेली मडकी आव्यात भाजली जातात. नंतर ती विक्रीसाठी तयार होतात. संक्रांतीसाठी तीन ते चार आकारची मडकी बनवण्यासाठीची लगबग गावोगावी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
गाव बाजारबंदीचा फटका
संक्रांतीच्या सणाला सुवासिनी मडक्यात ठेवलेल्या ज्वारी व गव्हाच्या ओंब्यांचे पूजन करतात.या मडक्यांचा उपयोग नंतर वेगवेगळ्या विधीसाठीदेखील होतो. दरवर्षी या मडक्यांची विक्री कारागीर गावोगावी भरणाऱ्या बाजारातून करत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद असल्याने विक्रीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी दहा हजार मडकी बनवायचो, यंदा सात हजार मडकी बनवणार असल्याचे वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्र ओळी : राजुरी ( ता. करमाळा) येथील वैजीनाथ वाघमारे पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनवताना. ( छायाचित्र : अक्षय आखाडे)
===Photopath===
241220\24sol_1_24122020_4.jpg
===Caption===
राजुरी ( ता करमाळा) येथील वैजिनाथ वाघमारे मातीेची पारंपरिक मातीची भांडी बनवताना. ( छायाचित्र : अक्षय आखाडे)