सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नूतन खासदार अॅड. शरद बनसोडे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामप्पा पाटील, ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस (आठवले) राजा सरवदे, रामचंद्र जन्नू, शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, अॅड. रजाक शेख, राजू पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, अमर पुदाले, प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेविका इंदिरा कुडक्याल, शोभा बनशेट्टी, विजया वड्डेपल्ली, भाजपाचे शहर सरचिटणीस विक्रम देशमुख, चंद्रकांत रमणशेट्टी, अनुजा कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अॅड. शरद बनसोडे व त्यांच्या पत्नी वर्षा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. विजयकुमार देशमुख म्हणाले की, गेल्या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव करून आ. सिद्रामप्पा पाटील हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा इतिहास झाला असून देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून महायुतीचे अॅड. शरद बनसोडे हे निवडून आले आहेत. जिल्ह्यात ६६१ बुथपैकी ५१३ बुथवर भाजपाला आघाडी मिळाली आहे. जनतेने आमच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आहे, त्याला पात्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.
-----------------------------------
माजी आमदार पाटील...
लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील मनोगत व्यक्त करताना व्यासपीठावरील नावे घेत होते तेव्हा त्यांनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील असा उल्लेख केला तेव्हा लोकांमधून आवाज झाला. तेव्हा आपली चूक लक्षात येताच त्यांनी नव्हे नव्हे चुकून शब्द तोंडात आला मी त्यांना राज्याचे भावी गृहमंत्री म्हणू इच्छितो असे सांगून आपल्या भाषणातील दुरुस्ती केली.
----------------------------- .
..अन् सभा गुंडाळली
नागरी सत्कार सुरू झाला, मान्यवरांच्या भाषणाला सुरूवात झाली तेव्हा पावसाने हजेरी लावली. पाऊस मोठा झाल्याने अर्ध्यातून समारंभ गुंडाळणे भाग पडले