- सचिन जवळकोटेसोलापूर : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिल्लीत स्नेहभोजन ठेवलेलं. महाराष्ट्रातूनही अनेक दिग्गज नेते सोहळ्याला जमलेले. यावेळी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हेही आवर्जून उपस्थित राहिलेले. यावेळी गर्दीपासून दूर जात पवारांनी संजयमामांना हळूच विचारलं, ‘तुमच्याही घरी पाहुणे आले होते म्हणे. खरं की काय ?’ तेव्हा मान हलवत संजयमामा उत्तरले, ‘नाही.. घरी नाही आले, त्यांनीच मोठ्या बंधूंना मुंबईत आमंत्रण दिलं.’महाराष्ट्राच्या सरकारमधील अनेक नेत्यांसाठी ठरलेली ‘ईडीपीडा’ दिल्लीच्या हिरवळीवरही चर्चिली गेली, त्याची ही छोटीशी झलक. मंगळवारी रात्री या स्नेहभोजन सोहळ्यात संजयमामांना कोपऱ्यात घेत पवारांनी ईडीचा विषय काढला. ‘तुमच्या गावातही आले होते का ते अधिकारी?’ या त्यांच्या प्रश्नावर मामांनी केवळ चौकशी झाल्याची माहिती दिली. यावेळी माजी मंत्री सुनील तटकरे अन् खासदार सुप्रिया सुळे थोडेसे लांब थांबले होते; मात्र ‘ईडी’चा विषय निघताच सुप्रियाताई पुढं सरसावल्या अन् त्यांनी ‘संजय राऊतांच्या इस्टेटवरही टाच,’ यावर सविस्तर माहिती देण्यास सुरूवात केली.माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे सहावेळा विधानसभेवर निवडून आलेत. सहा साखर कारखाने अन् सूतगिरणीसह अनेक संस्था त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात. मतदारसंघातील शिवसेनेच्याच एका नेत्याने ‘ईडी’कडे तक्रार केल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी सुरू झालीय.बबनदादा अन् त्यांचे पुत्र रणजितसिंह या दोघांनाही चौकशीसाठी तीनवेळा समन्स पाठविलं गेलंय. आतापर्यंत केवळ मुंबई-नागपुरातील सीमित असणारी ईडी यंत्रणा निमगावसारख्या छोट्याशा गावापर्यंत पोहोचलीय. बबनदादांचे धाकटे बंधू संजयमामा हेही लगतच्या करमाळ्याचे आमदार असून, ते उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. गेल्यावेळी माढा लोकसभेला उभारण्यास शरद पवारांनी नकार दिल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती.
खूप दिवसांनी जवळीकमाढ्याचे आमदार बंधू तसे पवार घराण्याच्या जवळचे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यातील पक्षाच्या मेळाव्याकडे आमदार बबनदादांनी पाठ फिरविलेली. त्यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही जोरदार रंगलेल्या. पोस्ट फिरलेल्या, मात्र राष्ट्रवादीच्याच तिकिटावर ते निवडून आलेले. निकालानंतर ‘ज्याची सत्ता त्यालाच पाठिंबा’, अशी सावध प्रतिक्रिया संजयमामांनीही दिलेली. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होणार, अशीच परिस्थिती. त्यावेळी मामांच्या या सूचक वक्तव्यामुळे शरद पवारही त्यांच्यावर नाराज होते. मात्र सध्याच्या ‘ईडी’प्रकरणात शिंदे बंधूंना पवार घराण्याची पूर्णपणे सहानुभूती मिळालेली. त्यामुळे या दोघांमधील राजकीय दुरावा दूर होऊन अधिक जवळीक निर्माण झालेली.