पंढरपूर : शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणून आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली. त्यामुळे चळवळ मागे पडली आणि ‘तो’ नेताही पवारांच्या आता जवळ नाही. तसेच सोलापूर येथील पवारांची सभा ही केविलवाणी झाली. ज्या सेनापतींनी रिंगणातून पळ काढला त्याबद्दल काय बोलणार? अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरात आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जयसिद्धेश्वर यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. तसेच देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे, असे सांगितले.
उत्तर प्रदेशामध्ये भाजपला विरोध म्हणून सपा आणि बसपा एकत्र आले. यामध्ये काँग्रेसने पण सामील होणार असे वाटले. मात्र यापासून वेगळे राहून सर्व जागांवर उमेदवार उभे केले. याचा फायदा निवडणुकीत भाजपला होणार आहे़ यावरून काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी टीका त्यांनी केली.
तसेच काँग्रेसचा जाहीरनामा हा निवडणुकीचा जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात या निवडणुकीत चमत्कार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदाची निवडणूक ही घराणेशाही, धार्मिकता याविरुद्ध आहे. निवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.
सोलापूरचा पाणी प्रश्न शिंदे सोडवू शकले नाहीत सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, केंद्रात मंत्री पद उपभोगले. मात्र सोलापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी येते हे दुर्दैव आहे, अशीही टीका यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.
काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम - उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसने सपा आणि बसपा बरोबर आघाडी न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. यामुळे उलट याचा फायदा भाजपलाच होणार आहे़ त्यामुळे काँग्रेसचे नेते जर वंचित आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणत असतील तर काँग्रेसच खºया अर्थाने भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी टीकाही आनंदराज आंबेडकर यांनी बोलताना शेवटी केली़