सोलापूर : सोलापूर हे सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा गाव आहे. त्यामुळे माझी अनेक वर्षांपासून कामाची एक पद्धत आहे. मी जेव्हा नव्याने कामाला सुरूवात करतो, तेव्हा सोलापूर किंवा कोल्हापुरातून करतो. त्यामुळे मी राजीनामा मागे घेतल्यानंतर सोलापुरातून नव्याने कामाला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी एकजूटीने लढू. नवी ऊर्जा घेऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोलापुरात बोलले.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. रात्री मुक्काम करून सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने निपाणीकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला. नितीश कुमार हे गुरूवारी, ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दिवशी आपण त्यांना भेटणार का, असे विचारले असता पवार म्हणाले, त्यांचा मॅसेज आला आहे. त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी चर्चा करू. सध्या भाजपला पर्याय देण्याची गरज आहे. त्यामुळे नितीश कुमार असतील किंवा ममता बॅनर्जी यांच्यासोबत समन्वय राखणे गरजेचे आहे. यांना साथ देणे, सहकार्य करणे ही माझी भूमिका राहणार आहे.