भाजपच आता काँग्रेसयुक्त : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 06:26 IST2024-04-15T06:25:18+5:302024-04-15T06:26:34+5:30
सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा

भाजपच आता काँग्रेसयुक्त : शरद पवार
लोकमत न्यूज नेटवर्क, अकलूज (जि. सोलापूर) : काँग्रेसमुक्त भारत करण्यास निघालेल्या भाजपमध्ये ४० टक्के लोक काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे. लोकशाहीत सत्तारूढ पक्षाच्या बरोबरीने विरोधकांना महत्त्व असते. परंतु देशात एकही विरोधक ठेवायचा नाही, ही भाजपची संस्कृती लोकशाहीला घातक आहे, अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे स्नेह भोजनासाठी शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित हाेते.
या तीनही नेत्यांमध्ये एका बंद खोलीत चर्चा झाली. सुशीलकुमार शिंदे, मोहिते पाटील व मी एकत्र आलो आहे, याचा महाराष्ट्रात निश्चित फरक पडेल, असे पवारांनी यांनी या चर्चेनंतर सांगितले. मोहिते पाटील आमच्या पक्षासोबत येत आहेत. आमच्या आमदारांची संख्या कमी असली तरी निकालानंतर आमच्या खासदारांची संख्या वाढलेली दिसेल, असेही ते म्हणाले.