राकेश कदम
सोलापूर - दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत शरद पवार यांनी उध्दव ठाकरेंना सल्ला देणे गरजेचे होते, असा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी लगावला.विखे-पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत. चार हुतात्मा चौक परिसराच्या सुशोभीकरणाचे भूमीपूजन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन भाष्य करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले.
शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. राज्याच्या जबाबदार लोकांनी हे वातावरण दुरुस्त करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ही पावले टाकण्याची जास्त जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. कारण, ते राज्याचे प्रमुख आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर तुमचे मत काय असा प्रश्न विखे-पाटील यांना मंगळवारी पत्रकारांनी विचारला. त्यावेळी, हा सल्ला पवारांनी उध्दव ठाकरेंना देणे आवश्यक होते, असे विखे-पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या दुष्टीने आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार आहोत. राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नसून त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेऊ.असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस हीं होत्या. त्यांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांनी केलं.