नासीर कबीरकरमाळा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकाºयांचा कानोसा घेण्यासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बागल, मोहिते-पाटील व शिंदे या तिन्ही गटाची दिलजमाई करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
शुक्रवारच्या शरद पवार यांच्या दौºयाची तयारी बागल गटाने सुरू के ली असून, पवार हेलिकॉप्टरने पुण्यातून करमाळ्यात सकाळी १० वा. येणार असल्याने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानात आज हेलिपॅड बनविला आहे. पवार सर्वप्रथम श्रीकमलादेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ११ वा. देवीच्या पायथ्याजवळच असलेल्या मंगल कार्यालयात करमाळा तालुका व माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने करमाळ्यात स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेले गट-तट एकत्रित येऊ लागले आहेत. बैठकीनंतर बागल यांच्या निवासस्थानी पवारांच्या उपस्थितीत दुपारी १ ते २ या वेळेत स्नेहभोजन होणार आहे.
आम्हाला निरोप नाही: संजय शिंदे गटाची प्रतिक्रिया- करमाळ्यात शरद पवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी मेळावा आहे. पण आम्हाला त्या बैठकीचा अद्याप निरोप आला नाही, असे जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांचे समर्थक, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, सुजित बागल यांनी सांगितले तर संजय शिंदे गटाचेच मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे यांनी निरोप मिळाला असून मी जाणार असल्याचे सांगितले.