वनविभागाला नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश मिळूनही बिबट्याला शार्प शूटरचा नेम का लागत नाही? याविषयी आता उलट-सुलट चर्चा सुरू आहे. गुरुवारी सांगवी नं. २ येथे मनीषा पाटील या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यातून त्या बचावल्या. या भागात २०० वनविभागाचे कर्मचारी तैनात असताना गेल्या १० दिवसांपासून वनविभागाला बिबट्यास जेरबंद करता आले नाही. बिबट्याचा प्रवास सांगवी-नरसोबाचीवाडी ते वांगी नंबर ४ असा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री दोन वाजता परप्रांतीय मच्छीमारांना बिबट्या दिसला होता. परंतु, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण, शुक्रवारी वनविभागाची यंत्रणा वांगी नं. ४ वरून बिबट्याचा माग काढत बिटरगाव शिवारात पोचली. येथील विठ्ठल रोडगे यांच्या शेतात सापळा लावला व बिबट्या दिसताच शार्प शूटरने त्याच्यावर तीन वेळा फायरिंग केली. परंतु, त्याला चकवा देऊन निसटण्यात तो पुन्हा यशस्वी झाला. पुढे तो बोरकर व नलवडे यांच्या शेतातून उसाच्या फडात गेला.
बिबट्याला पकडण्यासाठी शिकार करणाऱ्या वैदूना कुत्र्यांसह बोलावण्यात आले आहे. त्यांनीही रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. बिबट्याचा प्रवास आतापर्यंत उजनी धरणाच्या पाण्याच्या काठापर्यंत झाला असून, आता पुढे जाणे शक्य नसल्याने पुन्हा वांगीच्या दिशेने बिबट्या माघारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ऊसतोड मजूर निवाऱ्याला शाळेत
बिबट्याच्या दहशतीमुळे ऊसतोडही सध्या बंद ठेवण्यात आली आहे. ऊस आणि केळीचे क्षेत्र या भागात जास्त असल्याने तो याचा फायदा घेत आहे. ऊसतोड कामगारांना पालात उघड्यावर न राहू देता शाळेच्या खोल्या राहण्यासाठी दिल्या आहेत.
---