कुर्डूवाडी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांची सेवा करता करता स्वतःच कोरोनाबाधित कधी झाल्या, हे त्यांना कळालेच नाही. त्यावर अगदी यशस्वी मात करीत संजीवनी दबडे सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील आरोग्य सेविकेत पहिल्या कोरोना योद्धा ठरल्या आहेत. त्यानंतरही कोरोनाला न डगमगता या कठीण सेवेत त्यांची अविरतपणे सेवा अद्यापपर्यंत सुरू आहे.
गेल्या वर्षी पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले. आरोग्याचीच कर्मचारी असूनदेखील त्यांच्या घराला केले गेलेले त्यावेळेचे काटेरी कुंपण हे त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा धक्का होता, स्वतःची ८० वर्षीय आई व संपूर्ण कुटुंब एकत्र राहत होत होते. त्यामुळे सगळ्यांना खूप काळजी वाटायची पण त्यातून प्रत्येकाला समर्थपणे सामोरे जाणे बंधनकारकच असल्याने त्यावर त्यांनी मानसिक तयारी करून मात केली. या कालावधीत त्यांना पती सूर्यकांत खडके, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच, पर्यवेक्षक अंकुश कुंभार यांनी मोठा आधार दिला असल्याचे आरोग्य सेविका संजीवनी दबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आरोग्य सेविका संजीवनी दबडे यांनी आपल्या आरोग्य सेवेला दौंड (जि. पुणे) पंचायत समितीच्या आरोग्य विभागातून केली. तिथे ८ वर्ष सेवा बजाविल्यानंतर त्या सोलापूर जिल्हा परिषदेंतर्गत करमाळा आरोग्य विभागात दाखल झाल्या. तेथील ४ वर्षे सेवेनंतर माढा तालुक्यात त्यांच्या सेवेला प्रारंभ झाला. त्यात चिंचोली उपकेंद्र येथे १२ वर्षे, दारफळ उपकेंद्र येथे ४ वर्षे त्यांनी सेवा बजावली. सध्या रोपळे येथील आरोग्य केंद्रात त्या गेल्या ७ वर्षांपासून सेवा करीत आहेत.
---
फोटो ओळ-
रोपळे येथे कोरोनाच्या लसीकरणाची जबाबदारी पार पाडताना आरोग्य सेविका संजीवनी दबडे.