बार्शी : आजपर्यंत घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवास खांदा देण्याचे काम पुरुष करत आले. परंतु मुलीप्रमाणेच सांभाळ केलेल्या चार सुनांनी वयोवृद्ध सासूचे निधन झाल्यानंतर तिच्या पार्थिवास खांदा देत वेगळाच आदर्श घालून दिला.
सासू - सुनांतील वादविवाद कोणासाठी नवे नसून घरापासून ते थेट पोलीस ठाणे अन न्यायालयात हे वाद पाहायला मिळताहेत. मात्र, बदलत्या परिस्थितीत लेकीप्रमाणे सुना व आईप्रमाणं सासू असं नातं जपणाऱ्या या मुंढे कुटुंबातील मायेच्या एका धाग्यात जपलेल्या कुटुंबांतील प्रेमळ सासूबाई दमयंती कारभारी मुंढे (वय ७०) यांचं बुधवारी निधन झालं. मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या चारही सुनांनी सासुबाईंच्या पार्थिवाला खांदा देऊन आजपर्यंतच्या परंपरेला दिला. सासू-सुनांच्या नात्यातील ही माया सर्वांसमोर दिशादर्शक ठरली आहे.
दमयंती कारभारी मुंढे यांचे वयाच्या ७०व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. आजपर्यत अध्यात्माची साथसंगत करीत त्यांनी अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंढे आणि मनोरमा बळवंत मुंढे या चार सुनांना कायम मुलींप्रमाणे प्रेम आणि माया दिली. या सुनांनीही सासूबाईंचा शब्द पाळत शब्दानेही कधी दुखावले नाही. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती यांना चौघींपैकी कधी कोणी ‘तू-मी’ असे केले नाही. त्यामुळे त्यांच्यातले नाते सासू-सून असे न राहता आई-मुलीप्रेमाणेच फुलत जाऊन शेवटपर्यंत टिकलेही.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मळेगावाची स्वतंत्र ओळ्ख करून देणारे तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या मातोश्री होत्या, तर दमयंती या १९९० ते १०९५ दरम्यान पंचायत समिती सदस्य होत्या.
पतीकडून संमती
दरम्यान, श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त असलेल्या दमयंती यांचे श्रीकृष्णाचा वार असलेल्या बुधवारी व एकादशीच्या दिवशीच निधन झाले. अंत्ययात्रा निघताना पार्थिवास खांदा देण्यासाठी त्यांचे पती कारभारी मुंढे यांनी या बदलास संमती देताच या सुनानीच पुढे येऊन खांदा दिला.