सोलापूर : कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या अक्कलकोट तालुक्यातील शेगावमध्ये वाळू ठेका अन् सार्वजनिक कार्यक्रमातील मानपानावरुन पुतण्याचा गोळी घालून खून केलेल्या सरपंचासह चौघांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.
सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव बाबुराव पाटील (वय-३५), लायप्पा बाबुराव पाटील (वय-३१), उमेश श्रीशैल पाटील, मुरत्यप्पा दºयाप्पा आरवत (सर्व रा. शेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १८ मे रोजी सकाळी ८.३0 वाजता महादेव पाटील हा गावातील लायव्वा मंदिराजवळ कॅन्टीनसमोर बसला होता. तेव्हा पिंटू पाटील तेथे आला व त्याने आमच्यावर गुन्हा कशासाठी दाखल केला, असा जाब विचारला त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. दोघांमध्ये मारामारी होत असताना लायप्पा बाबुराव पाटील तेथे आला. त्याने महादेव यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने डोक्यात दगड घातला. श्रीशैल बसप्पा पाटील हा धावत आला व त्याने काठीने मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना पिंटू पाटील याला दोघांनी बंदूक आणून दिली. पिंटू पाटील याने बंदूक महादेव पाटील याच्या दिशेने धरून गोळी झाडली व तेथून पळून गेला. गोळी महादेव पाटील यांच्या पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले. प्रकाश पाटील यांनी महादेव पाटील यांना तत्काळ जखमी अवस्थेत कारमध्ये घालून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान १९ मे रोजी सकाळी महादेव पाटील यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी एकूण नऊ जणांविरूद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी रमेश श्रीशैल पाटील, श्रीशैल पाटील, जगदेव तम्माराव पाटील यांना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले होते. मुख्य आरोपी पिंटू पाटील व अन्य तीन आरोपी कर्नाटक सीमेवरील कोर्सेगाव येथील एका शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास करीत एका शेतात लपून बसलेल्या चौघा आरोपींना अटक केली.
आणखी दोन आरोपींचा शोध सुरू...- महादेव पाटील यांचा खून केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. घटनेच्या पहिल्या दिवशी एका आरोपीला अटक झाली होती, पाच दिवसांनंतर दोघांना अटक केली होती. खुनाच्या घटनेनंतर दहाव्या दिवशी मुख्य आरोपीसह चौघांना अटक झाली आहे. सध्या सात जणांना अटक झाली असून, आणखी दोन आरोपींचा तपास पोलीस करीत आहेत.