सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता गायकवाड यांनी एकाकी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे माढ्यातून शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. सचिन देशमुख यांनी भूमिका बदलल्याने तिथे तिरंगी लढत होणार आहे. वेळ कमी असून निवडणुकीची तयारी झालेली नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीतून बाहेर पडत असल्याचे ॲड. देशमुख यांनी जाहीर केले.
सोमवार, २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. सोमवारी दिवसभर प्रमुख पक्षाच्या नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची महसूल भवन मध्ये मोठी गर्दी होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार होते. यापैकी ११ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापुरात काँग्रेसचे प्रणिती शिंदे तसेच भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत असणार आहे. यांच्यासोबत आणखी १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार होते. यापैकी सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील तसेच वंचितचे रमेश बारसकर यांच्या थेट लढत होणार आहे. यांच्यासोबत आणखी २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.