सोलापूर : दूध पावडरला दिलेले अनुदान म्हणजे पावडर तयार करणारे व शासन या दोघांनी तिजोरीवर टाकलेली धाडच आहे, पावडरला अनुदान दिले म्हणजे शेतक-यांना दूधदर वाढले असे नाही. दूध उत्पादकांचे दरवाढीसाठी राज्यात तीव्र आंदोलन होणार असून त्याची सुरुवात मी स्वत: रविवार १५ जुलै रोजी रात्री १२ वाजता पंढरपूर येथे विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढ करावी व ही रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी किंवा दूध डेअरीचालकांनी थेट दर वाढवून द्यावा, अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री सल्लागार समिती नेमली होती. या समितीमध्ये राज्यातील खासगी दूध डेअरीचालकांचा समावेश होता. या समितीने दूध पावडर निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये व दूध निर्यातीला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.
ही घोषणाच शेतकºयांसाठी फसवी असल्याचे खा. शेट्टी यांचे म्हणणे आहे. पावडर तयार करणारे खासगी दूध डेअरचालक असून त्यांना पावडर निर्यातीवर अनुदान शासन देणार आहे. यामुळे शेतकºयांना दर वाढवून मिळणार नाही, असे शेट्टी म्हणाले. सरकार व खासगी दूध संस्थाचालकांचा शेतकºयांना चार पैसे मिळावेत हा शुद्ध हेतू असता तर दूध खरेदीदर वाढला असता, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.
दूध विकायचेच नाही, असे शेतकºयांनी ठरवले असून १६ जुलैपासून सुरू होणाºया आंदोलनाची सुरुवात रविवारी रात्री १२ वाजता पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून मी स्वत: करणार असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. थेट शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये जमा करावे किंवा दूध संस्थाचालकांनी दूध खरेदीदर वाढवून द्यावा, या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू होणार असल्याचे खा. शेट्टी म्हणाले.
उलट दोन रुपयांनी दर कमी झाला- शासनाने दूध पावडर निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी घेतल्यानंतर १३ मे ते ३० जून २०१८ या कालावधीत शासनाने ५३ कोटी रुपये दूध संस्थाचालकांना अनुदान म्हणून दिले आहेत. ५३ कोटी रुपये अनुदान दिल्यानंतर खासगी संस्थांनी दूध खरेदीदर दोन रुपयांनी कमी केल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. ‘दूध पोळल्यावर ताक फुंकून प्यावे’ असे म्हणतात, ५३ कोटी रुपये पाण्यात गेल्याचा अनुभव पाहता मंत्र्यांनी थेट शेतकºयांना अनुदान देण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असे शेट्टी म्हणाले.