लांबोटी : पाणीपट्टी न भरली गेल्याचे कारण पुढे करत शिरापूर, मोरवंची, भांबेवाडी, खुनेश्वरला होणारे लांबोटी वितरिकेचे पाणी थांबवले गेले आहे. येथील शेतकऱ्यांतून याबाबत नाराजी व्यक्त झाली आहे.
मोहोळ तालुक्यात लांबोटी येथून जी वितरिका गेलेली आहे त्या वितरिकेवर शिरापूर (सो), मोरवंची, खुनेश्वर, भांबेवाडी येथील शेतीला पाणी मिळते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात कोरोनासारख्या महामारीने सर्वांना ग्रासले आहे. मात्र अर्थव्यवस्थेचा आणि देशाचा कणा एकमेव शेतकरी ठरला आहे. या स्थितीत पाणीपट्टी भरली नाही म्हणून वाया जाणारे पाणीसुद्धा थांबविले गेले आहे. याला शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतून विरोध होत आहे. जर लांबोटी वितरिकेचा सौंदणे कट वरून जास्त दाबाने पाणीपुरवठा केला नाही, तर वितरिकेचे दरवाजे उघडण्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
याबाबत जलसंपदा विभागाने तत्काळ दखल घ्यावी. अगोदरच दुष्काळामुळे, ऊस बिलामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला आता पाणी अडवून वेठीला धरू नये. दोन दिवसांत शेतीला पाणीपुरवठा जास्त दाबाने पूर्ववत करावा; अन्यथा हाताने कॅनॉलची दारे उघडून लांबोटी वितरिकेचा पाणीपुरवठा सुरू करू, असा इशारा शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नागेश वनकळसे यांनी दिला आहे.
----
---
...तर पाणीपट्टी भरायची कशी? : नानासाहेब सावंत
दरवर्षी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी शेतकरी चोखपणे भरतात. पाणीपट्टी ही ऊस बिलामधून थेट कारखान्याकडून वजावट केली जाते. परंतु या वर्षी कारखान्यांनी बिले दिली नाहीत. तर जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरायची कशी, असा यक्षप्रश्न शिरापूरचे नानासाहेब सावंत यांनी केला आहे. कारखान्यांनी ऊस बिले काढली की आपोआप पाणीपट्टी जाणार आहे हे माहीत असूनही जलसंपदा विभाग आणि प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.