सोलापूर : लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या आमने - सामने असलेल्या सुशीलकुमार शिंदे आणि खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी आज पक्षीय बंध तोडून सोलापूरच्या विकासावर सुमारे पाऊण तास चर्चा केली. या भेटीत शिंदे यांनी बनसोडे यांना काही टिप्स दिल्या; तर राज्यातील नेतृत्व बदलाविषयी खासगीत मतप्रदर्शन केले.या भेटीत दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिंदे यांनी अॅड. बनसोडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोघांच्या चर्चेत शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. अॅड. बनसोडे यांनीच यासंदर्भात शिंदे यांना विचारले. त्यावर त्यांनी खासगीत मतप्रदर्शन केले; पण याबाबत मी काही बोलणार नसल्याचे अॅड. बनसोडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अॅड. बनसोडे म्हणाले की, शिंदे यांनी सोलापूरचे नेतृत्व करत असताना बोरामणी विमानतळासह केंद्राच्या योजना आणल्या त्या रखडल्या जाऊ नयेत आणि योजनांची तपशिलात माहिती घेणे आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी शिंदे यांची भेट घेतली. सोलापूरच्या विकासासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे, असाही विश्वास शिंदे यांनी दिल्याचे ते म्हणाले. --------------------महापालिकेची चूक...!सोलापुरातील समस्या आणि विकासकामांसंदर्भात महापालिकेत नुकतीच एक बैठक झाली. त्यासाठी खासदार बनसोडे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. हा विषय दोघांच्या भेटीदरम्यान निघाला तेव्हा खासदारांना बैठकीसाठी न बोलाविणे, ही महापालिकेची चूक होती, असे मत शिंदे यांनी व्यक्त केल्याचे अॅड. बनसोडे यांनी सांगितले.शिंदे हे जरी काँग्रेसचे नेते असले आणि मी भाजपचा खासदार असलो तरी ते अनुभवी नेते आहेत. त्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी मी त्यांचे मार्गदर्शन घेणारच असे अॅड. बनसोडे यांनी स्पष्ट केले.
शिंदे - बनसोडे यांची विकासावर चर्चा
By admin | Published: June 21, 2014 1:09 AM