सोलापूर: राज्यात सरकार येउनही लाेक आपल्या बाजूने नाहीत. आपल्या बाजूने जनाधार नाही हे शिंदे-फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. हे सरकार निवडणुकांना घाबरते, अशी टीका प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी केले.
काॅंग्रेसच्या हात ते हात जाेडाे अभियानाची बैठक येथील स्वागत नगरमध्ये झाली. यावेळी त्या बाेलत हाेत्या. आमदार शिंदे म्हणाल्या, देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, रेशनवर धान्य मिळत नाही. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे नोटबंदी, जीएसटी आली. या दाेन्हींमुळे उद्योगधंदे बंद पड़त आहेत. धार्मिक उन्माद पैदा केला जात आहे. पुण्याच्या पोटनिवडणुकीत खोके सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले. अख्खे मंत्रीमंडळ आले. प्रचंड पैसा वापरून प्रचार यंत्रणा राबविली. तरीही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात दारुण पराभव झाला. बाकी ठिकाणी सुद्धा त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. मतांची टक्केवारी घटली आहे. आता निवडणुका घेण्यास शिंदे-फडणवीस घाबरत आहेत.