लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : अफजल खानाच्या कबर प्रकरणावर भाजप आणि शिंदे गटात सोशल मीडियावर श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे दिवस आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे झाले नव्हते, ही गोष्ट लक्षात ठेवा, शब्दांत अशा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ठणकावले. भाजप कार्यकत्यांनी यावर संयम राखत शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे शक्य झाले.. 'अफजल खानाच्या पापांचा शिवछत्रपतींच्या मावळ्याने असा घेतला बदला, अशा पोस्ट भाजपचे कार्यकर्ते किरण पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या.
शिंदे यांना भाजपकडून सल्ले
अमोल शिंदे हे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी सोशल मीडियावर असे व्यक्त होणे, कोणाच्या पोस्टवर बोलणे शोभत नाही, असा सल्ला भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनीही शिंदे यांना याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र, अमोल शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
भाजप आयटी सेल सक्रिय
भाजपच्या आयटी सेलकडून यासंदर्भातील पोस्ट, व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच या गोष्टी शक्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. कार्यकर्ते या पोस्ट व्हायरल करीत आहेत. अमोल शिंदे यांनी मात्र याला आक्षेप घेतला आहे.
कबर काढणे हे कुण्या एकट्याचे श्रेय नाही
पाच वर्षांपूर्वी केवळ एकाच व्यक्तीला कामाचे श्रेय दिले जायचे. यातूनच युती तुटली. प्रतापगडाच्या पाथय्याशी असलेली कबर काढणे हे कुण्या एकट्याचे श्रेय नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यापुढील काळात कोणत्याही सरकारी कामाचे श्रेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले पाहिजे. दोघांनी मिळून काम करायचे ठरले आहे. त्यामुळेच मला या विषयावर बोलावे लागले. - अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"