सोलापूर: निवडणुकीत मला स्वकीयांनीच धोका दिला. सर्व ते प्रयत्न करूनही माझा पराभव झाला. माझे डिपॉझिट वाचले हे काय कमी नाही. यासाठी मी कोणाला जबाबदार धरणार नाही, मात्र यापुढच्या काळात निवडणुकीच्या राजकारणातून मी कायमची निवृत्ती घेत असल्याची घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिंदे हे प्रथमच सोलापुरात आले होते. सोमवारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर त्यांनी मंगळवारी आपली भूमिका विशद केली. माझ्याकडे गृहखाते असल्याने पराभव होणार याची मला पुसटशी कल्पना होती. यामुळेच मी सोलापुरात १२ दिवस तळ ठोकून राहिलो. निवडणुकीनंतर ती शंका खरी ठरली. स्वकियांनी दगा दिला. प्रचारात छोटे-छोटे मेळावे घेतले, यात सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच ३ लाख ६७ हजार मते मिळाली. माझे डिपॉझिट वाचले याचे मला समाधान आहे. फक्त वाढलेली मते मी मिळवू शकलो नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. निवडणुकीला उभे राहण्याची माझी इच्छा नव्हती, वारंवार तसे जाहीरपणे सांगितले होते. हायकमांडसमोर माझी भूमिका मांडली होती, हायकमांडने आदेश दिल्यानेच निवडणूक लढवावी लागली. पराभवामुळे सोलापूरच्या विकासापासून लक्ष काढून घेणार का? असा सवाल पत्रकारांनी करताच ते म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी सोलापूरची सेवा करीत राहीन. यापुढे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत असलो तरी समाजकारणातून सेवा करीत राहणार आहे. भाजपाचे नूतन खासदार शरद बनसोडे यांनी मदत मागितल्यास मी सहकार्य करण्यास तयार आहे. जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प रखडणार नाही, त्यासाठी मी स्वत: आग्रही राहणार आहे.
------------------------
कारणांचा शोध सुरू..
पराभवाला केवळ मोदी लाट हे एकमेव कारण नाही. त्यासाठी अनेक कारणे असू शकतात. आम्ही कुठे कमी पडलो, काय चुका घडल्या, तरुणांच्या संपर्कात कोणत्या त्रुटी राहिल्या, या सगळ्या कारणांचा शोध सुरू आहे. राज्यपातळीवरही अशी अनेक कारणे असू शकतात. त्यासाठीच सत्यशोधन समिती स्थापन करण्याची सूचना मी मुंबईच्या चिंतन बैठकीत मांडली आहे. सोलापुरातील कारणे वेगळी असू शकतात, त्याचा वेध घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत ती दुरुस्त करू. सोलापूरसाठी वेळ देणार.. सोलापूरच्या जनतेने मला खूप प्रेम दिले, निवडणुकीत हार झाली म्हणून सोलापूरकडे पाठ कधीच फिरविणार नाही. सोलापूरसाठी यापुढच्या काळातही वेळ देईल. त्याशिवाय इथल्या जनतेचे ऋण कसे फेडता येतील?
---------------------------
हात जोडून विनंती...
काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार असते. या विधानाचा दाखला देत शिंदे यांनी सोलापूरच्या काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची प्रांजळ कबुली दिली. ही गटबाजी संपविण्याची जबाबदारी एकट्याची नाही, सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकत्र काम करण्यात नेत्यांचे आणि पक्षाचे हित असते. मी स्वत: हात जोडून नम्रपणे विनंती करतो, बाबा..रे.. आतातरी गटबाजी करू नका., छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून काँग्रेस उभी राहिली आहे. आता नेत्यांनी ती संपविण्याचा प्रयत्न करणे गैर आहे.
-----------------------
काय म्हणाले शिंदे...
निवडणुकीत अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच होता... शपथविधीला सार्क देशाच्या प्रतिनिधींना बोलावण्याची कल्पना चांगली... घुसखोरी, नक्षलवाद, जातीय दंगली ही नवीन सरकारची आव्हाने... राज्यात नेतृत्व बदल नाही मिलिंद देवरा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही.. जय-पराजयाला खिलाडूपणे सामोरे जाणार्यांपैकी मी... मोदींची पावले चांगल्या दिशेने पडत आहेत. भ्रष्टाचाराची झळ गरिबांना बसते, तो संपला पाहिजे... चिंतन बैठकातून सत्यशोधन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास पुन्हा चांगले दिवस...