जगन्नाथ हुक्केरी। सोलापूर : कुत्रा हा कुत्राच असतो. त्याची तुलना अन्य कोणाशी होत नसली तरी काही कुत्रे अन्नाला जागणारे इमानी असतात तर काही मोकाट आणि हिंस्त्रही. अशा या श्वानांची जमात मोठ्याने वाढून गावात दहशत निर्माण होऊ नये, म्हणून शिंगडगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ९७ नरांसह मादी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून एका प्रकारे श्वानांच्या जमातीचे ‘फॅमिली प्लॅनिंग’चं केले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार हजार लोकसंख्या असलेलं शिंगडगाव. जलयुक्तच्या कामामुळे जिल्ह्यात प्रकाशझोतात आलेलं गाव. आता कुत्र्यांचे निर्बिजीकरण अन् लसीकरणाने हे गाव पुन्हा एकदा आदर्शाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. गावात शंभर ते सव्वाशे कुत्री. त्यात काही पाळीव. दिवसेंदिवस या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने ‘गाव तसं लहान, कुत्र्यांची संख्या मात्र महान’ अशीच प्रचिती येत होती. अशात बार्शी तालुक्यात कुत्र्याने एका चिमुरड्याच्या कानाचे लचके तोडल्याचे वृत्त गावात धडकले अन् सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांनी अॅनिमल राहतच्या माध्यमातून कुत्र्यांचे कुटुंब नियोजन करण्याचे ठरविले. त्यानंतर ही मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात आली.
काही पाळीव कुत्रे सोडून गावासह वाड्या-वस्त्यावरील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. यात मादीही सुटल्या नाहीत. त्यांचं गर्भाशय काढून एक प्रकारे कुटुंब नियोजनच या गावाने केलंय. ‘दिसला कुत्रा, टाका बिस्कीट अन् टाका जाळी’, अशा पद्धतीने कुत्र्यांना पकडून ही मोहीम फत्ते करण्यात आली. केवळ निर्बिजीकरण न करता अँटी रेबिज लसीकरणही करण्यात आले. याचा परिणाम वर्षभर कुत्र्याच्या शरीरात राहात असल्याने हे कुत्रे निर्बिजीकरणानंतर पिसाळत नाहीत. खरुज लागू नये, म्हणून कुत्र्यांना लसीकरणही करण्यात आले. यामुळे गावातील कुत्र्यांची दहशत आता पूर्णपणे संपली आहे.
असे केले आॅपरेशन- कुत्र्यांना पकडल्यानंतर आधी अँटी रेबिज, त्यानंतर पेन किलर देण्यात आले. कुत्र्याला टेबलावर झोपवून भूल देण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आॅपरेशन केले. नराला आॅपरेशन करण्यासाठी कमी वेळ लागतो तर मादीला थोडा जास्त वेळ लागतो. ही प्रक्रिया करताना सलाईनही लावले गेले. हार्टची तपासणी, श्वासोच्छवास याचीही तपासणी करण्यात आली. कुत्रा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडण्यात आले. टाक्या घालण्यासाठी कॅटगट धागा वापरण्यात आला. यामुळे टाक्या काढण्याची गरज भासत नाही.
निर्बीजीकरणामुळे संख्या घटणार नाही- कुत्र्यांमध्ये प्रजनन क्षमता अधिक आहे. एकावेळी मादी चारपेक्षा जास्त पिलांना जन्म देते. आता गावात बहुतांश कुत्र्यांची नसबंदी केल्याने कुत्र्यांची संख्या वाढणार नाही. भविष्यात ही जमात नष्ट होईल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण पाळीव कुत्र्यांना काहीच केले नाही. शिवाय बाहेरून येणाºया कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने नियंत्रणात राहून ही संख्या आपोआप वाढणार आहे.
यांचा पुढाकार महत्त्वाचा- अॅनिमल राहतचे डॉ. राकेश चितोडा, डॉ. आकाश जाधव, डॉ. वर्षा पांचाळ यांच्यासह सहायक सोमनाथ देशमुख, भीमाशंकर विजापुरे, आनंद बिराजदार, अजित मोटे, सुधाकर ओव्हाळ, रसूल शेख यांनी आॅपरेशनचे काम केले तर सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी, उपसरपंच गुरूबाई म्हेत्रे, राजेंद्र कोळी, हणमंत जमादार, महारुद्र बडुरे, सुभाष कोरे, संतोष म्हेत्रे, संतोष एकनाथे, महादेव कोल्हे, धुळप्पा बडुरे, शिवशंकर अचलेरे, सूर्यकांत पाटील, मल्लिकार्जुन मोळे, संजय हळ्ळे, धोंडिराज कोरे, ग्रामसेवक रमेश गायकवाड यांनी पुढाकार घेत ही मोहीम यशस्वी केली.
शिंगडगावसारख्या छोट्या गावामध्ये शंभर टक्के निर्बिजीकरण होऊ शकते तर मोठ्या शहरात का होऊ शकत नाही. यासाठी मानसिकता हवी. शासनाकडे सगळ्या गोष्टी, यंत्रणा आहेत. पण ही मोहीम यशस्वी होत नाही. यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेत शिंगडगावचा आदर्श घ्यावा.-डॉ. राकेश चितोडा, अॅनिमल राहत