वडवळ : प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य, इतिहास वेगळा असतो. आपल्या पूर्वजांनी भौतिक साधनांचा वापर करून मंदिर, स्मृतिशिल्पे उभारून हा इतिहास शब्दबद्ध करून ऐतिहासिक वारसा जतन केला आहे.
आज आधुनिक काळातदेखील वीरगळसारख्या दगडी स्मृतिशिल्पातून तर काही ठिकाणी मंदिर व मूर्तीमधून जतन आहेत. मोहोळ तालुक्यातील शिरापूर (मो) येथील हनुमान मंदिरासमोर मात्र ग्रामस्थांनी ही स्मृतिशिल्पे, वीरगळ जतन करून ठेवली आहेत. त्यावर इतिहास कोरला गेलेला आहे. मंदिराच्या समोर वीरगळ आहे, यावर तीन चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत. घोड्यावर बसून युद्ध सुरू असल्याचा प्रसंग असून, या लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या गावातील शूरवीरांचे शिल्प आहे. शिरापूर (मो) हे गाव सीना नदीच्या काठी वसले असून, येथील वीरगळ व परिसरातील काही समाधी स्थळाचा अभ्यास केला तर नव्याने इतिहासावर प्रकाश पडू शकतो.
आपल्या भागातील प्राचीन वारसा स्थळाविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती होईल अन् त्याविषयी आदर निर्माण होऊन ही स्मृतिशिल्पे जपण्याचा प्रयत्न व्हावा, हा याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. - नितीन अणवेकर, वीरगळ, शिलालेख अभ्यासक, सोलापूर
आमचे गाव धार्मिक परंपरा जपणारे आहे, त्यामुळे पूर्वजांनी सांगितल्यानुसार अनेक प्रथा आम्ही पाळत आहोत, आम्हाला नेमका इतिहास स्पष्टपणे माहीत नसला तरी आम्ही ही शिल्पे आजही जतन केली आहेत. - राजाराम जावळे, ग्रामस्थ शिरापूर (मो)