सोलापूर : पन्हाळा ते पावनखिंड..तीन दिवसाची मोहिम..दोन रात्र..नदी,नाले,तलाव,ओढे, डोंगर अन् जगलातून सफर करीत सोलापुरातील शेकडो शिवभक्तांनी पदभ्रमंती करीत पन्हाळा ते पावनखिंड अशी ५४ किलोमीटरची माेहिम पार केली. या मोहिमेत लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत लोकांचा समावेश होता. यात शाळा, महाविद्यालयातील मुलंही हिरीरीने सहभागी झाली होती.
व्यसनमुक्तीचा संदेश देत राष्ट्रभक्ती, गरजवंतांना मदत, देशासाठी काही तरी करण्याची जिद्द युवकांमध्ये निर्माण करण्यासाठी व राष्ट्रप्रथम वंदे मातरम ह्या बोध वाक्यावर चालणारी हिंदवी परिवाराच्यावतीने मागील १२ वर्षापासून पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. ही तीन दिवशीय मोहिम संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे याच्या मार्गदर्शनाखाली झाली. या मोहिमेची सुरुवात नरवीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात झाली.
२३० शिवभक्त अन् १३० महिलांचा सहभाग..
यंदाच्या मोहिमेत मोहिमेत ५६० शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये १३० महिला सहभागी झाल्या होत्या. सोलापूर शहर व जिल्ह्यातुन एकूण २३० शिवभक्त उपस्थित होते. यात माळशिरस, मंगळवेढा, सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर आदी तालुक्यातून असंख्य शिवभक्त ह्या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेले होते. या मोहिमेत केएलई स्कुलचे ४१ तर सुयश गुरूकुलचे ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते