सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणाचे काम जोपर्यंत कलावंतांच्या अपेक्षेनुसार होत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ द्यायचे नाही. पालिकेच्या सभागृहात या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडा. कुठे आणि कसा खर्च झाला, याची विचारणा करा. जर घाईमध्ये नूतनीकरण उद्घाटनाचा घाट घातला तर आंदोलन करा, असा आदेश आज शिवसेनेचे उपनेते आणि ‘होम मिनिस्टर’मधील भावोजी आदेश बांदेकर यांनी आज शिवसैनिकांना दिला.गेल्या दीड वर्षापासून हुतात्मा स्मृती मंदिरच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम समाधानकारक झाले नसल्याची कलावंतांची तक्रार आहे. नूतनीकरण कामाच्या उद्घाटनासाठीही घाई केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असलेल्या बांदेकर यांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत ‘हुतात्मा’ची पाहणी केली. विजय साळुंके, गुरू वठारे, शिवानंद चलवादी, मनोज अंकुश, बागवान, प्रशांत बडवे आदी कलावंत व रसिकांनी बांदेकरांना नूतनीकरणातील त्रुटी दाखविल्या. बांदेकर यांनी या संदर्भात पालिकेचे अभियंते अवताडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पॉवर ग्रीड सूचना केल्यानंतरही प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले.‘हुतात्मा’ची पाहणी केल्यानंतर बांदेकर म्हणाले की, या नाट्यगृहामध्ये सुरूवातीपासून ज्या त्रुटी होत्या, त्या नूतनीकरणानंतरही कायम आहेत. खुर्च्यांच्या रांगा व्यवस्थित नाहीत. त्यामुळे प्रयोग सुरू झाल्यानंतर ब्लॅकआऊटच्या काळात एखादा वृध्द रसिक आला तर तो ठेच लागून कोसळण्याची भीती आहे. शिवाय खुर्च्याही आरामदायी नसल्यामुळे कोणताही रसिक सलग तीन तास बसून प्रयोग पाहू शकत नाही. रंगमंचावरील मंडपी आणि विंगांचे काम अद्याप झाले नाही. या स्थितीत शिवसेना नूतनीकरणाचे उद्घाटन होऊ देणार नाही. सभागृहात शिवसेनेकडून लक्षवेधी मांडून नूतनीकरण कामासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब विचारण्यात येईल, असेही बांदेकर म्हणाले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे - पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेविका अस्मिता गायकवाड, नगरसेवक मनोज शेजवाल, विजय पुकाळे, शाहू शिंदे आदी उपस्थित होते.--------------------कलावंतांची आज बैठक‘हुतात्मा’च्या नूतनीकरणात नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, आणखी कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहेत, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ‘हुतात्मा’च्या प्रांगणात नाट्यकलावंत, वाद्यवृंद कलावंत आणि रसिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.----------------------------मंगल कार्यालय आहे?हुतात्मा स्मृती मंदिर हे नाट्यगृह आहे; पण एखाद्या मंगल कार्यालयाप्रमाणे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करताना कोणत्याही रंगकर्मीला विश्वासात घेण्यात आले नाही. कलावंतांचे समाधान झाल्यानंतरच नूतनीकरण पूर्ण होईल. अर्धवट आणि सदोष अवस्थेतील नाट्यगृह आम्ही सुरू होऊ देणार नाही, असाही इशारा बांदेकर यांनी दिला.
हुतात्मा स्मृती मंदिरसाठी शिवसेना आक्रमक
By admin | Published: July 19, 2014 1:02 AM