'युती गेली खड्ड्यात म्हणणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार, आमची मनसेसोबत आघाडी नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:04 AM2019-02-19T08:04:58+5:302019-02-19T08:05:21+5:30
अशोक चव्हाण यांची टीका; आघाडीच्या जागावाटपाचे चित्र आठवड्यात स्पष्ट होणार
सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे- फेक देंगे, अशी हमरीतुमरीची भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आज सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
शिवसेनेचा भाजपाविरोध किती पोकळ होता, हे यावरून दिसून येईल. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेवेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त केली.
शिवसेनेची दुटप्पी भूमिका घेतल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. शिवसेनेने इतके वाभाडे काढूनसुद्धा भाजपा त्यांच्यासोबत जाते, यामध्ये दोघांची लाचारी दिसून येते. शिवसेनेच्या बाबतीत अमित शहा व इतरांनी केलेली भाषणे पाहता सर्वसामान्यांनाही यांच्या युतीबद्दल धक्का बसला आहे. सत्तेसाठी हपापलेली शिवसेना इतका अपमान झाल्यावरही भाजपासोबत जाते. केवळ स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची वेळ आल्याने सत्तेसाठी शिवसेना लाचार होताना दिसत आहे. मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या जागा वाटपाचे चित्र आठवड्यात स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
मनसेबरोबर आघाडी नाही
काँग्रेस व मनसेचे तात्त्विक मतभेद आहेत ते दूर झालेले नाहीत. मुंबईचा मनसेचा इतिहास पाहता आपण आघाडीबाबत अजिबात उत्सुक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेबाबत आघाडीचे वक्तव्य केले होते, आम्ही त्याला होकार कळविलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.