मोहोळ : शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून दोघांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला टेम्पोचालक भैय्या असवले याला पोलीस कोठडी संपल्याने २६ जुलै रोजी सोलापूर येथील न्यायालयात उभे केले असता पुन्हा एकदा १ दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली. यापूर्वी त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती; परंतु या प्रकरणात एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणात आरोपींना पकडण्यात यावे या मागणीसाठी पीडित कुटुंबातील नातेवाईकांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर व मोहोळ तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोमवारी भेट घेतली.
१४ जुलै रोजी शिवसैनिक सतीश क्षीरसागर, विजय सरवदे यांच्या अंगावर टेम्पो घालून कट रचून खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित ऊर्फ आण्णा फडतरे, पिंटू सुरवसे, भैय्या असवले यांच्यासह तपासात निष्पन्न झालेले आकाश बरकडे, गोटू सरवदे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अटकेत असलेला टेम्पोचालक भैय्या असवले यास प्रारंभी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.नंतर पुन्हा तीन दिवसांची वाढवून देण्यात आली होती. आज २६ जुलै रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता आरोपीचा मोबाईल जप्त करावयाचा असून त्या टेम्पोचा मालक कोण आहे याबाबतची चौकशी करण्याकामी पोलीस कोठडी मागण्यात आली त्यानुसार न्यायालयाने आरोपीस पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे .
दरम्यान, २६ जुलै रोजी पीडित परिवारातील नातेवाईकांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन आरोपींना तातडीने पकडण्यात यावे अशी मागणी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केली.
यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, तालुकाप्रमुख अशोक भोसले, महेश देशमुख, नागेश वनकळसे, महादेव गोडसे, विकास बनसोडे, अशोक गायकवाड, अविनाश क्षीरसागर, दादा क्षीरसागर, नारायण क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, विमल सरवदे, विश्रांता क्षीरसागर उपस्थित होते.
----
अधीक्षकांकडून कारवाईची ग्वाही
याप्रकरणी गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली असता रेकॉर्ड तपासून दोषींवर कठोर कारवाई करु अशी ग्वाही दिली. यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या सर्वांना शासन करण्यात पोलीस कमी पडणार नसल्याची ग्वाही सातपुते यांनी शिष्टमंडळाला दिली.
---
सरवदे यांच्या मातेने फोडला टाहो
मयत विजय सरवदे यांच्या आईने एकुलता एक मुलगा गेल्याचा टाहो पोलीस अधीक्षकांपुढे फोडला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुलीच आहेत. स्व. सतीश क्षीरसागर यांच्या आईने हात जोडून न्याय द्या अशी विनवणी केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासन भक्कमपणे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.