लोकसभा निवडणुकांची भाजपने जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, आता निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये विरोध सुरू असल्याचे दिसत आहे. माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. त्यांनी मतदारसंघात गाठीभेटीही वाढवल्या असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. तर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'
शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी सावंत म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारांनी आमच्या माढ्याकडे लक्ष दिलेले नाही, त्यांच्याकडून आमच्या मतदारसंघात एक रुपयाही आलेला नाही. आज त्यांच्याविषयी सर्व गावांमधून नाराजी आहे. रेल्वेगेट तसेच अन्य कामांबाबत त्यांनी काहीच काम केलेले नाही. त्यांच्याबाबतीत खूप नाराजी आहे, असंही सावंत म्हणाले.
'लोकसभेच्या उमेदवारांनी आमच्यासोबत बैठक घेतली पाहिजे,वरिष्ठांनी त्यांना सूचना द्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही, त्यांनी जनतेची काम कळवली पाहिजेत. पाच वर्षात आमची कोणतीच काम झालेली नाहीत. हेच उमेदवार ठेवायची असतील तर त्यांनी आधी आमची काम करायला पाहिजेत, असंही सावंत म्हणाले. एकतर उमेदवार बदला किंवा त्यांनी आमच्यासोबत बैठक घ्यावी, असंही शिवाजी सावंत म्हणाले.
मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बैठक
भाजपने माढामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, माढामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छूक आहेत. उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याचे चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचे स्पष्ट संकेत शेकापचे जयंत पाटील यांनी दिले होते.