Sangola Vidhan Sabha ( Marathi News ) : शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून अधिकृत उमेदवार असल्याचे भासवून प्रचार, सभेतून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात "हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीतून सांगोला विधानसभेची जागा उद्धवसेना पक्षाला दिली असून, दीपक बापूसाहेब साळुंखे पाटील यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म सोबत जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला, तो मंजूरही झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला, तो मंजूरही झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तोही मंजूर झाला.
दरम्यान शेकाप उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख हे जाणीवपूर्वक सांगोला मतदारसंघात आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवीत आहेत. प्रचाराच्या सर्व साहित्यावर जाणीवपूर्वक महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून प्रचार, सभेतून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहरप्रमुख तुषार इंगळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोरे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय पवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन प्राप्त झाले असून कोण उमेदवार अधिकृत आहे याबाबतचा खुलासा महाविकास आघाडीतील नेत्यांनीच करायला पाहिजे. निवडणूक आयोग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. - भैरप्पा माळी, निवडणूक निर्णय अधिकारी, सांगोला
पराभव समोर दिसू लागल्याने आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहोत, हे सांगण्याचा शिवसेना उबाठा उमेदवाराकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हतबल झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे. परंतु सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत. कोण अधिकृत उमेदवार आहे, याबाबतचा खुलासा येत्या दोन दिवसात होईल. - डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप, उमेदवार
उद्धवसेनेच्या पत्रिकेत नाव, उपस्थिती मात्र काडादींकडे
उद्धवसेनेचे सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी हत्तूरमध्ये झाला. या कार्यक्रमासाठी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. या पदाधिकाऱ्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत होती. परंतु, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष हरिश पाटील, भीमाशंकर जमादार हे काँग्रेस नेते अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमाला हजर होते. या नेत्यांची भाषणेही झाली.