सोलापूर: शिवजन्मोत्सवाच्या तयारीसाठी शहरभर एकच माहोल निर्माण झाला आहे. मोठमोठ्या मंडळांपासून ते गल्लीबोळात शिवरायांच्या ‘जय भवानी, जय शिवराय’च्या जयघोषानं लेझीम ताफ्याच्या सरावामध्ये रंग भरू लागला आहे. दुसरीकडे शिवरायांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवलेख स्पर्धा, शिवचरित्र वाचन अशा विविधांगी उपक्रमांसाठी शिवभक्त सरसावले आहेत.
संभाजी आरमार दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे जनमानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरण्याचा प्रयत्न करते.यंदाही जंगी मिरवणुकीबरोबरच छत्रपती शिवरायांच्या अलौकिक प्रेरणादायी जीवनचरित्राचा युवा पिढीने सखोल अभ्यास करत स्वत:मध्ये शिवगुणांची जोपासना करावी, या हेतूने शिवलेख स्पर्धेचे आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आभाळाला गवसणी घालणारं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य, अनोख्या युद्धकौशल्याचा अभ्यास करावा, त्यांनी महिलांविषयक जागृत केलेल्या आत्मसन्मानाच्या भूमिकेपुढे नतमस्तक व्हावं. शिवरायांच्या अशा अष्टपैलू गुणांचा करावा तितका अभ्यास तोकडाच. जगभर शिवचरित्रावर पीएच. डी. होत असताना ज्या मातीमध्ये शिवरायांनी कर्तृत्वाचा हिमालय उभा केला त्या मातीतील विद्यार्थी मात्र या अभ्यासापासून वंचित राहू नयेत, या हेतूने संभाजी आरमारने ही स्पर्धा आयोजित केली आहे, असे आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सांगितले.
स्पर्धा पारदर्शी व्हावी, या दृष्टीने शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. सतीश कदम, प्रा. चंद्रकांत चव्हाण, माजी पोलीस अधिकारी मुसा खान, विशाल फुटाणे ही निवड समिती स्पर्धेतील विजेते ठरविणार आहे.
भागवत चाळीत शिवचरित्र वाचनाचा उपक्रम - भागवत चाळ शिवजन्मोत्सव मंडळांनी १९९२ पासून आपलं वेगळेपण टिकवलं आहे. २००१ पासून तिथीनुसार येणाºया राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दरवर्षी गडकोट मोहीम आखली जाते. आजवर ३० ते ४० किल्ल्यांना भेटी देऊन त्यांचा इतिहास अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी विविध देखाव्याने १४ ते १९ फेब्रुवारीपर्यंत देखावे आयोजित केले जातात. ६ जून राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाºया मंडळांना ‘ शिवगौरव’ पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यंदा होटगी मठाधीश शिवाचार्यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. शिवाय शिवभक्तांसाठी ‘शिवचरित्र वाचन’ उपक्रम हाती घेतला आहे. या वर्षापासून प्रतिष्ठापनेदिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पालखीद्वारे मंडपातून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत नेऊन पालखी प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे, असे मंडळाचे प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी स्पष्ट केले.
हे आहेत शिवलेख स्पर्धेचे विषय- या अनोख्या स्पर्धेमध्ये शिवरायांचे महिलांविषयक धोरण, शिवरायांची युद्धनीती व परराष्टÑविषयक धोरण, शिवरायांची गुणग्राहकता, शेतकºयांचे खरे संरक्षक छत्रपती शिवाजी महाराज, शिवचरित्रातील मानवी मूल्ये, छत्रपतींचा राज्याभिषेक- भारतीय लोकशाहीची मुहूर्तमेढ या विषयांवर किमान ५०० शब्दांमध्ये लेख लिहावयाचा आहे. केवळ पदवी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत हे लेख संभाजी आरमारच्या ५९, पार्क चौक स्टेडियम गाळा, सिद्धेश्वर मंदिरशेजारी पोहोचावेत, असे आवाहन संभाजी आरमारच्या वतीने करण्यात आले आहे. विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, २ हजार अशी पहिली तीन क्रमांकाची आणि १ हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.