सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वळण देणाºया करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बागल गटाचे प्रा़ शिवाजीराव बंडगर तर उपसभापतीपदी बागल गटाचे चिंतामणी जगताप यांची निवड झाली. या निवडीवेळी दोन गटात हाणामारी झाल्याने काही काळ परिसरता तणावाचे वातावरण होते़ त्यामुळे पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविला होता.
करमाळा बाजार समितीच्या सभापती बुधवारी सकाळी निवडणुक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी एम़ बी़ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक पार पडली. करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ जागेपैकी बागल गटाला ८, आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला ८ जागा तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान माजी आमदार जयवंतराव जगताप हे दोन मतदार संघातून निवडून आल्याने त्यांना एका जागेवरील हक्क सोडावा लागला त्यामुळे पाटील व जगताप गटाची बलाबल १ जागेने कमी झाली. त्यामुळे सत्तेच्या चाव्या जि़. प़ अध्यक्ष संजय शिंदे यांच्या असलेल्या दोन उमेदवारांकडे गेल्या. बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडीच्या पूर्वसंध्येला आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप युतीमधील झरे मतदारसंघातील उमेदवार प्रा़ शिवाजीराव बंडगर यांनी अचानक बंडखोरी करून बागल गटात बुधवारी सकाळी प्रवेश केला़ बागल गटाने त्यांना सभापतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले़ व उपसभापती चिंतामनी नामदेवराव जगताप यांना संधी दिली.