प्रभू पुजारी ।
पंढरपूर : मिर्झाराजे यांच्यासोबत विजापूरच्या आदिलशाह विरोधातील संयुक्त मोहिमेप्रसंगी, जालना मोहिमेला जाताना आणि राज्याभिषेक झाल्यानंतर कुतूबशाहाच्या भेटीला जाताना अशा तीन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचासोलापूर जिल्ह्यातून प्रवास झाल्याची माहिती ज्येष्ठ इतिहासकार गोपाळराव देशमुख यांनी दिली.
१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला गोपाळराव देशमुख यांच्याशी संवाद साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहीम याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील चित्तथरारक आणि अंगावर शहारे आणणारे बारकावे सांगितले.
१६६५ साली पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे यांनी आदिलशाहच्या विरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली़ तेव्हा शिवाजी महाराजांसोबत नेताजी पालकर होते तर मिर्झाराजे यांच्यासोबत दिलेरखान पठाण सरदार होते़ नेताजी पालकर आघाडीला असल्याने त्यांनी प्रथम फलटण ताब्यात घेतले़ त्यानंतर फलटणजवळीलच नाथवडा किल्ला ताब्यात घेतला़ त्यानंतर पिलीव (ता़ माळशिरस), भाळवणी, पंढरपूर, कासेगावमार्गे मंगळवेढ्याकडे रवाना झाले़ १८ डिसेंबर १६६५ साली मंगळवेढ्याच्या अलीकडे एक मजल आले़ तेथील माण नदीच्या तीरावर तळ टाकला, मात्र नेताजी पालकर यांनी पुढे जाऊन मंगळवेढ्याचा किल्ला ताब्यात घेतला.
मंगळवेढ्याचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांची फौज व मोगलाईची फौज मंगळवेढ्याच्या किल्ल्याजवळ (कृष्ण तलाव येथे) होती़ दिलेरखानाच्या मनातील हेतू शिवाजी महाराजांना समजल्यामुळे त्यांनी पन्हाळा मोहीम हाती घेण्याची मागणी केली आणि ती मंजूर करून घेतली़ मंजुरी मिळाल्यानंतर ११ जानेवारी १६६६ रोजी शिवाजी महाराज पन्हाळा मोहिमेसाठी निघून गेले़ म्हणजेच १८ डिसेंबर ते ११ जानेवारी असे जवळपास २५ दिवस शिवाजी महाराज मंगळवेढ्यात तळ ठोकून होते.
मोगलाईच्या मुलखाची जालना शहरावर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराज हे सोबत ८ ते ९ हजारांची फौज घेऊन निघाले होते़ तेव्हा त्यांचा प्रवास सांगोला, कासेगाव भीमा नदी ओलांडून जालन्याकडे झाला. त्यांच्यासोबत भाळवणीचे सरलष्कर सिद्धूजीराव नाईक-निंबाळकर होते, अशी दुसरी नोंद आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते कुतूबशाहांची भेट घेण्यासाठी भागानगरला (हैदराबाद) गेले होते, मात्र कोणत्या मार्गाने याची नोंद इतिहासात नाही, पण भारत संशोधन इतिहास मंडळाच्या एका त्रैमासिकात याचा नकाशा दिला आहे़ त्यानुसार मंगळवेढ्यामार्गे भागानगरला गेले असावेत़ यावेळी त्यांच्या स्वारीचा थाट वेगळाच होता़ शस्त्रे, दारुगोळा, हत्ती, घोडे, उंट, सोबत सैन्य असा लवाजमा होता.
१९ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे या दोघांनी मंगळवेढ्याच्या किल्ल्याची पाहणी केली. शिवाजी महाराज तेव्हा मंगळवेढ्यात आल्याची अधिकृत नोंद असल्याचे गोपाळराव देशमुख यांनी सांगितले.