बार्शी/सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आ. दिलीप सोपल यांनी बुधवार, दि. २८ आॅगस्ट रोजी मुंबईत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, माजी आमदार दिलीप माने यांनीही याच मुहुर्तावर शक्तीप्रदर्शन करीत शिवबंधन बांधून घेण्याचे ठरविले आहे. याशिवाय भाजपाचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांचाही उद्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी सोपल यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नंदकुमार काशीद, नागेश अक्कलकोटे, युवराज काटे, गणेश जाधव, मंगल शेलवणे, दगडू मांगडे, सुधीर सोपल, अॅड. काकासाहेब गुंड, आबासाहेब पवार, बी. एन. चव्हाण, सुभाष शेळके, श्रीमंत थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोपल म्हणाले की, १९७८ पासून मी बार्शीच्या राजकारणात सक्रिय आहे. आज तिसरी पिढी माझ्यासोबत काम करत आहे. माझ्या सर्व सहकाºयांचा शिवसेनेत जाण्याचा आग्रह होता. विरोधक कोणत्याही एका पक्षात स्थिर न राहता सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आमच्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना त्रास देण्याचं काम करत आले आहेत. त्यामुळे सर्वांचा शिवसेनेत जाण्याचा आग्रह असल्याने मला निर्णय घेणे भाग पडले. राज्यात युती आहे का नाही, याचा विचार न करता शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी कुस्ती ठरवून व्यायाम करत नाही, जो कोणी विरोधात असेल त्याच्याशी लढायला तयार असल्याचे सोपल यावेळी म्हणाले. माझी कोणाबद्दल तक्रार नाही, शरद पवार साहेबांविषयी कोणताही राग नाही. त्यांच्याविषयीचा आदर कमी झालेला नाही, असे स्पष्ट करीत मी उद्या २७ आॅगस्ट रोजी विधानसभा सभापतीकडे आमदारकीचा राजीनामा देणार असून, त्यानंतर परवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आ. सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा शनिवारी केली होती. त्यानंतर त्यांनी २८ आॅगस्टच्या मुहुर्तावर मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेण्याचा मुहूर्त धरला आहे. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचीही त्यांनी तयारी केली आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक हेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईला जाण्यासाठी ४० एसटी बसगाड्यांचे बुकींग केल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह ते मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. माने यांच्या शिवसेना प्रवेशाच्या घोषणेमुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. माने यांना पक्ष सोडू नये म्हणून आपण विनंती केली होती, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली. काँग्रेसमध्ये कोणी वाली राहिला नाही, या टिकेवर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने आजपर्यंत त्यांना आमदारकी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापतीपद दिले. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. काँग्रेस कधीच नेतृत्वहिन नाही. त्यांच्या डोक्यात वेगळे असल्याने असे बोलत आहेत.
मानेंच्या कार्यकर्त्यांसाठी ४० एसटी गाड्या बुक- काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे बुधवारी हातात शिवबंधन बांधणार आहेत़ यासाठी सोलापुरातील हजारो कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत़ यासाठी सोलापूर एसटी प्रशासनाच्या ४० एसटी गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. या गाड्या आज सायंकाळी मुंबईसाठी रवाना होणार आहेत़ चाळीस गाड्यांमधील ३५ गाड्यांचे भाडे भरण्यात आले आहे़ एका एसटी गाडीला जवळपास पन्नास हजार रुपये भाडे असणार आहे़ यामुळे सोलापूर आगाराला एका दिवसात जवळपास वीस लाखांचे उत्पन्न मिळणार आहे़ यासाठी सोलापूर एसटी विभागाने आपल्या इतर आगारातून गाड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे़ सोमवारी सायंकाळी या गाड्या स्वच्छ करण्याचे काम सुरू होते़ माने यांच्या एका समर्थकाने या एसटीच्या बस गाड्या आरक्षित केल्या असल्याचे महामंडळाच्या अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.