सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर शिवगर्जना अभियानास सुरुवात झाली आहे. पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्यात उध्वव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविण्याचा निर्धार या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थकांनी केला.
या मेळाव्यास उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विजय कदम, शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे, सुप्रजा फातर्पेकर, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, युवा सेना सोलापूर संपर्क प्रमुख उत्तम आयवळे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, कैलास चव्हाण (सांगोला विधानसभा संपर्क प्रमुख) आदी जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी पप्पू तांबोळी, सचिन बंदपट्टे, राजश्री क्षीरसागर, दत्ता धोत्रे, निखिल पवार, महेश मोरे, भाजप युवा मोर्चा सचिव किरण सुतार, बजरंग कानगुडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी शिंदे गटाची संभावना मिंधे गट अशी करून ईडी आणि सीबीआय यांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करीत भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत षडयंत्र रचले. पण राज्यातील सर्वसामान्य जनतेला हे अजिबात रुचले नाही.पुढील प्रत्येक निवडणुकीत जनता याना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,यासाठी हिंदुहृय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति कुठल्याही स्वार्थाशिवाय निष्ठा बाळगत आलेले कार्यकर्ते देखील पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी जीवाचे रान करतील असा विश्वास विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवरांनी भाषणे केली.