सोलापूर - शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्यात शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस चार ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकिळ म्हणाले, शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचे बाहुले आहे. या काळात राज्यातील तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. या शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी पंढरपूर, करमाळा, मोहोळ आणि सोलापूर या मतदारसंघात शिवगर्जना अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता संत तनपुरे महाराज मठात जाहीर सभा होईल. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता करमाळा शहरात सभा होईल. शुक्रवारी सकाळी मोहोळ येथे सभा होईल. शनिवारी सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात सकाळी सभा होईल. सायंकाळी गोविंदश्री मंगल कार्यालयात सभा होईल. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी या सभेत मार्गदर्शन करणार आहेत, असे कोकिळ यांनी सांगितले.